वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, दुबई : पश्चिम आशियामध्ये जुलैपासून असलेली शांतता पुन्हा भंग पावली असून अमेरिकेने मंगळवारी रात्री दक्षिण इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल इराणने जॉर्डन, बहारिन, कुवेत, इराकमधील अमेरिकी तळांना लक्ष्य केले. ‘होर्मुझ’मधून जाणार्या जहाजांवर इराणने हल्ले केल्यानंतर ‘रिव्होल्युनशरी गार्ड्सवर हल्ले केल्याचे अमेरिकेने सांगितले.
अमेरिकेच्या हल्ल्यात किमान १२ जण ठार झाल्याची माहिती इराणने दिली. त्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील सिरिक कौंटीमधील एका विवाह सोहळ्यावरील हल्ल्यात मरण पावलेल्या चौघांचाही समावेश आहे. त्याशिवाय अनेकजण जखमी झाले आहेत. यानंतर अमेरिकेने इराणवर आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या हल्ल्याचे पडसाद आशियाई आणि युरोपातील देशांच्या शेअर बाजारांवर पडले. तसेच, कच्च्या तेलाचे दरही वाढले. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, रडार यंत्रणा, सागरी मालमत्ता, सुरुंग पेरण्याच्या क्षमता आणि दूरसंचार केंद्रांवर हल्ले केल्याचे अमेरिकेच्या लष्कराने सांगितले. यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील अनेक लक्ष्यांवर हल्ले केले.
जुलैनंतरचा सर्वात मोठा संघर्ष
अमेरिकेने जुलैच्या दुसर्या आठवड्यात इराणवर पुन्हा बॉम्बवर्षाव सुरू केला होता. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ संपूर्ण इराणवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या आठवड्यात हल्ले अचानक थांबवले. त्यानंतर पुन्हा एकदा शांतता चर्चेसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला अद्याप यश आलेले नसताना अमेरिकेने पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. त्यामध्ये लक्षणीय जीवितहानी झाली.
