अमेरिका-इराणमधील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत बुधवारी संपत असली, तरी दोन्ही देशांत चर्चेची अनिश्चितता कायम आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पटलावर वेगाने घडामोडी घडत असून, इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे प्रत्यक्ष चर्चा होणार का, याचे चित्र मंगळवारी उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. पाकिस्तानने दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यास नकार दिला. बुधवारपर्यंत करार न झाल्यास इराणवर बॉम्बहल्ला सुरू करू याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

अमेरिकेने इराणशी संबंधित आणखी एका तेलाच्या टँकरवर श्रीलंकेजवळ कारवाई केली असून, दोन्ही देशांतील चर्चेचे चित्र आणखी धुसर झाले आहे. अमेरिका आणि इराणमधील चर्चेसाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेला उपस्थित राहण्याबद्दल इराणने निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अटी स्वीकारल्या नाहीत, तर इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांना इराणनेही प्रत्युत्तर दिले असून, अमेरिकेला दोन्ही देशांमधील चर्चा ही आमच्या शरणागतीची हवी आहे, असे इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहंमद कालिबाफ यांनी म्हटले आहे.

इराणच्या आणखी एका तेल टँकरवर कारवाई

अमेरिकेने मंगळवारी श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणशी संबंधित तेलाच्या टँकरवर आपल्या तुकड्या उतरविल्या. आंतरराष्ट्रीय समुद्र निर्बंध घातलेल्या नौकांसाठी हे सुरक्षित स्थान नसल्याचे अमेरिकेच्या युद्ध विभागाने स्पष्ट केले आहे. इराणने त्यावर ‘तणावामध्ये वाढ झाली, तर त्याला अमेरिका जबाबदार असेल,’ असा इशारा दिला आहे. इराणशी निगडित ‘एमटी तिफानी’ या तेलाच्या टँकरवर अमेरिकी तुकड्या कुठलाही विरोध न होता उतरल्या. हा टँकर हिंदी महासागरात श्रीलंकेजवळ होता आणि तो सिंगापूरकडे जात होता. या टँकरची २० लाख बॅरल क्रूड तेल वाहून नेण्याची क्षमता आहे. इराणला मदत होईल, अशा निर्बंध घातलेल्या नौका जगात कुठेही असतील, तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले. दरम्यान, इराणने युद्धविरामाचे अनेकदा उल्लंघन केल्याची टिप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

इराण नक्की चर्चा करील. आशा आहे, की ते चांगला करार करतील आणि त्यांच्या देशाला उभारणी देतील. पण, काहीही झाले, तरी त्यांच्याकडे अण्वस्त्रे कदापि असणार नाहीत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका