एपी, दुबई

इराणने मंगळवारी अरब देशांतील अमेरिकी तळांना पुन्हा लक्ष्य करतानाच होर्मुझ सामुद्रधुनीतील ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना आणि तेलवाहतुकीलाही लक्ष्य केले. यावरून संतापलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापेक्षा २० पटींनी अधिक तीव्रतेचे हल्ले करू, असा इशारा दिला. इराणने त्यांच्या इशार्‍याला पोकळ धमकी म्हणून धुडकावून लावले.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतुकीला लक्ष्य केले. मालवाहतूक करणार्‍या एका नौकेला लक्ष्य केल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने दिली. पर्शियाच्या आखातात अनेक नौका लक्ष्य झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेलवाहतूक चालते. ती धोक्यात आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमामध्ये टिप्पणी करून इशारा दिला.

ट्रम्प-पुतिन यांची चर्चा

मॉस्को: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सोमवारी रात्री उशिरा फोन केला. जागतिक ऊर्जापुरवठा विस्कळित झाल्यावर त्यांनी चर्चा केली. रशियाच्या परराष्ट्र खात्यातील अधिकारी युरी उशाकोव्ह यांनी सांगितले, की दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. इराण युद्ध आणि युक्रेन युद्धासंदर्भातील त्रिस्तरीय चर्चा यांवर उभयतांत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली.