अमेरिका-इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा वणवा पेटला आहे. ८ एप्रिल २०२६ रोजी अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांत शांतता करारासाठी चर्चाही झाल्या. डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्याही केल्या. मात्र, त्यानंतर शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला आहे.

इराणने काही दिवसांपूर्वी जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळाचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर अमेरिकेनेही इराणवर भीषण हवाई हल्ले केले. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा दिला. त्यामुळे इराणनेही आक्रमक भूमिका घेत थेट अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे.

अमेरिकेने हल्ला केल्यास इराणकडून थेट सौदी, यूएई, कतार आणि इस्रायलमधील ऊर्जा प्रकल्पांची यादी जाहीर करत हल्ला करण्याचं टार्गेटच सांगितलं आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इराणच्या तस्नीम न्यूजने आहे.

वृत्तानुसार, अमेरिका किंवा इस्रायलने जर पुन्हा नव्याने हल्ले केले, तर इराणकडून आता मध्य पूर्वेतील प्रमुख ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, एका अमेरिकी अधिकाऱ्याने ‘ॲक्सिऑस’ला सांगितलं की, ट्रम्प इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याचा विचार करत आहेत. पण अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

इराणने जाहीर केली यादी

इराणच्या कथित यादीत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, बहरीन, इस्रायल या देशांतील ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या ठिकाणांना टार्गेट करण्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

इराणबरोबर युद्ध की शांतता? अमेरिकेने काढले तीन पर्याय?

‘ॲक्सिओस’च्या एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील चर्चेचा मुख्य विषय इराण युद्ध हाच होता. ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी इराणबाबत तीन पर्यांवर चर्चा केली.

पहिला पर्याय म्हणजे इराणबरोबर वाटाघाटींद्वारे करार करणं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.

दुसरा पर्याय म्हणजे इराणभोवती नौदलाची नाकेबंदी कायम ठेवणं आणि अतिरिक्त उपाययोजनांद्वारे आर्थिक दबाव आणखी वाढवणं.

तिसरा पर्याय म्हणजे शांतता राखण्यासाठी मुत्सद्देगिरी करणं आणि निर्बंध लादणं. मात्र, तरीही अपयश आल्यास लष्करी हल्ले पुन्हा सुरू करणं, या पर्याबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली.