दुबई, वॉशिंग्टन : इराणने अमेरिकेचे विमान पाडल्यानंतर बेपत्ता असलेल्या अमेरिकी सैनिकाची सुटका करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर रविवारी सकाळी ही माहिती दिली.
अमेरिकेचे ‘एफ-१५ ई स्ट्राईक ईगल’ विमान इराणमध्ये शुक्रवारी कोसळले. तेव्हापासून वैमानिकाचा शोध सुरू होता. इराणनेही बेपत्ता वैमानिकाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते. विमानातील दुसऱ्या क्रू सदस्याची अमेरिकेने यापूर्वीच सुटका केली. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर केलेल्या टिप्पणीत म्हटले, ‘या वैमानिकात्या बचावासाठी अनेक विमाने सहभागी झाली होती. त्याच्या ठिकाणावर २४ तास लक्ष ठेवून होती. त्याच्या सुटकेचे अतिशय बारकाइने नियोजन केले गेले.’
कोट हा शूर योद्धा इराणमध्ये पर्वतरांगांमध्ये अडकला होता. प्रत्येक क्षणाला शत्रू त्याच्यापर्यंत अधिक जवळ पोहोचत होता. वैमानिक जखमी झाला आहे. पण, त्याची प्रकृती स्थिर आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
बचावमोहिमेत इराणला चकवा
अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले, की बचावमोहिमेत एक विमान खराब झाल्यामुळे आम्हाला ते नष्ट करावे लागले. या मोहिमेसाठी ‘एमसी १३० जे’ हे खास विमान तयार करण्यात आले होते. ते खराब झाल्याने अमेरिकेनेच उडवून दिले. बचावमोहिमेत ‘सीआयए’चा सहभाग होता. मोहिमेत शत्रूला चकवा देण्याच्या तंत्राचा वापर करण्यात आला. इराणमध्ये वैमानिकाला जमिनीवरून नेले जात असल्याची हूल उठवली गेली.
अमेरिकेची विमाने पाडल्याचा दावा
दुबई अमेरिकेच्या बेपत्ता वैमानिकाच्या शोधमोहिमेदरम्यान अमेरिकेची अनेक विमाने इराणच्या इस्फाहान प्रांताच्या दक्षिणेकडे पाडल्याचा दावा इराणच्या अधिकाऱ्यांनी केला. यात दोन लष्करी मालवाहू विमाने आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा समावेश आहे. विमान कोसळल्याचे अवशेष व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले. इराणचे लष्कर आणि रिव्होल्युशनरी गार्ड यांनी वेगवेगळी निवेदने प्रसिद्ध केली. इस्फाहान प्रांतात इस्रायलची हर्मेस-९०० ड्रोन आणि अमेरिकेची एमक्यू-९ ड्रोन पाडल्याचे त्यात म्हटले आहे.
देशांतर्गत उत्पादनात वाढ
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑइल इंडिया लिमिटेड’ने देशांतर्गत क्रूड उत्पादन वाढविले आहे. राजस्थानच्या थार वाळवंटातून दिवसाला १२०२ बॅरल विक्रमी क्रूड उत्पादन कंपनीने घेतले आहे. गेल्या वर्षी दिवसाला ७०५ बॅरल तेलउत्पादन होत असे. त्यात आता ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तेलउत्पादन वाढविण्याची शक्यता
मॉस्को, लंडनः तेलाचे उत्पादन मे महिन्यात दररोज २.०६ लाख बॅरलनी वाढविण्यास ‘ओपेक प्लस’ संघटनेने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे या देशांनी उत्पादनवाढीसाठी दिलेली ही मान्यता केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
