USA Israel – Iran Conflict: अमेरिका आणि इस्त्रायलने इराणविरोधात सुरु केलेली लष्करी कारवाई तीव्र झाली असताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. इराणविरोधातील लष्करी कारवाई लवकरच थांबवली जाऊ शकते, असे डोनाल्ड ट्रम्प सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. पण, हा संघर्ष केव्हा थांबणार? याबाबत स्पष्ट आणि नेमकी माहिती त्यांनी दिलेली नाही. 

लवकरच समाप्त होणार संघर्ष?

फ्लोरिडामध्ये पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराण विरुद्धच्या संघर्षावर भाष्य केले. इराणविरोधातील लष्करी कारवाई केव्हा समाप्त होणार? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता, ‘लवकरच’, असे उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. “नेतृत्वासह त्यांनी सर्व गमावले आहे, किंबहुना त्याहून जास्त. नेतृत्वाचे दोन स्तर संपृष्टात आलेत. आता ज्या नेतृत्वाची ते चर्चा करतायेत त्यांच्याबद्दल अनेकांनी ऐकले देखील नाही,” असे ट्रम्प म्हणाले.

कारवाईचा अभिमान

पत्रकारांबरोबर संवाद साधण्यापूर्वी केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणविरोधातील कारवाईची माहिती दिली. मध्यपूर्वेत वर्चेस्व निर्माण करण्याचा त्यांचा (इराण) प्रयत्न होता. इस्त्रायलला संपविण्यासाठी ते निघाले होते. योग्य वेळ साधून आम्ही हा प्रयत्न रोखला आणि आम्ही हस्तक्षेप केल्याचा आम्हाला अभिमान आहे. हे सर्व लवकरच समाप्त होईल, पण पुन्हा सुरु झाल्यास त्यांच्यावर यापूर्वी पेक्षा जोरदार प्रहार केला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. संघर्ष सुरु झाल्यानंतर पहिल्या दोनच दिवसांत इराणची लष्कर नेस्तानाबूत केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, ऑपरेशन एपिक फ्युरी यशस्वी झाल्याचेही त्यांनी म्हटले.

इराण उद्धवस्त

त्यांच्याकडे (इराण) नौदल, हवाई दल किंवा हल्ला रोखण्यासाठी कुठलीही प्रणाली नाही. सर्व उद्धवस्त झाले आहे. त्यांच्याकडे रडार नाही. संवादाचे माध्यम अथवा नेतृत्व देखील नाही. सर्व समाप्त झाले आहे. आम्ही याला मोठं यश मानत आहोत. मोजताबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड केल्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. “यामुळे पूर्वीसारख्याच समस्या निर्माण होतील. मी या निवडीमुळे नाराज आहे”, असे ट्रम्प म्हणाले.

सर्वोच्च नेतेपदी मोजताबा खामेनींची निवड

अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर इराणने त्यांचे अयातुल्ला यांचे पूत्र ५६ वर्षीय मोजताबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड केली आहे. इराणच्या संसदेत एकमताने याबाबत निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मोजताबा यांची निवड निश्चित करण्यात आलीये. अमेरिका आणि इस्त्रायच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळ आणि इस्त्रायलच्या ठिकाणांवर हल्ला केला.