अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. यानंतर पश्चिम आशियामध्ये संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका पुन्हा एकदा युद्धात सहभागी झाली आहे, ज्यामध्ये अमेरिकन सैनिकांचे प्राणही जात आहेत, तर याबरोबर देशाला मोठा आर्थिक फटकाही बसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणवरील हल्ल्यांच्या पहिल्या २४ तासांतच अमेरिकेने ७७९ दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे ६९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध किमान एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे या युद्धाचा खर्च हा प्रचंड वाढणार आहे.

सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटीच्या डेटानुसार, कॅरियर स्ट्राईक ग्रुप्स ( जसे की जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस जेराल्ड आर फोर्ड) एक दिवस चालवण्याचा खर्च हा सुमारे ६.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच ५८ कोटी रुपये येतो. इराणच्या नेतृत्वावर हल्ले करण्यापूर्वी अमेरिकेने जेराल्ड आर फोर्डसह दोन एअरक्राफ्ट कॅरियर स्ट्राईक ग्रुप्स मध्यपूर्वेत तैनात केले होते. या हल्ल्यातच इराणचे सर्वोच्च नेते आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांना ठार करण्यात आले.

एकूणच हल्ल्याच्या आधी लष्करी तयारीचा भाग म्हणून विमानांची फेररचना, नौदलाची जहाजे तैनात करणे आणि प्रदेशातील इतर साधनांची जुळवाजुळव याचा अंदाजित खर्च जवळपास ६३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५ हजार ५५६ कोटी रुपये इतका असेल.

जर हा संघर्ष ट्रम्प यांनी संकेत दिल्याप्रमाणे दीर्घकाळ चालला, तर अमेरिकेचे तब्बल २१० अब्ज डॉलर्स म्हणजेच १८.८७ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे पेन व्हार्टन बजेट मॉडेलचे संचालक आणि देशातील अग्रगण्य आर्थिक विश्लेषकांपैकी एक, केंट स्मेटर्स (Kent Smetters) यांनी म्हटले आहे.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने आत्तापर्यंत इस्रायलला २१.७ अब्ज डॉलर्स इतका निधी लष्करी मदतीच्या स्वरुपात दिला आहे. या हल्ल्यात १२०० जणांचा मृत्यू झाला होता आणि २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. याबरोबरच अमेरिकेने येमेन, इराण आणि मध्यपूर्वेत इस्रायलने केलेल्या लष्करी कारवायांनाही पाठिंबा दिला आहे, ज्यावर त्यांनी ९.६५ अब्ज ते १२.०७ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या २०२५ च्या ‘कॉस्ट्स ऑफ वॉर’ रिपोर्टमध्ये दिलेले हे दोन्ही आकडे एकत्रित केल्यास, हा एकूण खर्च ३१.३५ अब्ज डॉलर्स (२.८२ लाख कोटी रुपये) ते ३३.७७ अब्ज डॉलर्स (३.०४ लाख कोटी रुपये) इतका होतो.

युद्ध किती काळ लांबणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा हे युद्ध किती काळ चालेल असे विचारले गेले. या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “आमच्या मते चार ते पाच आठवडे, पण आमच्याकडे त्यापेक्षाही खूप जास्त काळ सुरू ठेवण्याची क्षमता आहे. आम्ही हे करूच… कितीही वेळ लागला तरी चालेल, जे काही करावे लागेल ते करू.” इराणने देखील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत.