वॉशिंग्टन/दुबई : अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून पश्चिम आशियात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे इराणने सुरूच ठेवल्यामुळे अमेरिकेने हल्ले तीव्र केले असून, इराणच्या १४० लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. इराणनेही प्रत्युत्तरादाखल आखाती देशांतील अमेरिकी तळांना लक्ष्य केले. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याची घोषणाही इराणने केली. अमेरिकेने मात्र व्यावसायिक नौका येथून सुरक्षितपणे जात असल्याचा दावा केला.

अमेरिका आणि इराणने परस्परांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या नौकेला थांबविण्यासाठी गोळीबार केल्यानंतर सामुद्रधुनीतून सागरी वाहतूक थांबविल्याचा आणि या ठिकाणी अन्य एक नौकाही रविवारी निकामी केल्याचा दावा इराणने केला. अमेरिकेचा या प्रदेशातील हस्तक्षेप थांबत नाही, तोपर्यंत ‘होर्मुझ’ बंद राहील, असे इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने म्हटले आहे. अमेरिकी लष्कराच्या मध्य कमांडने मात्र ‘होर्मुझ’मधून सागरी वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट केले.

इराणची नागरी नौकांना लक्ष्य करण्याची क्षमता नष्ट करण्यासाठी १४० लष्करी ठिकाणांना शनिवारी लक्ष्य केल्याची माहिती मध्य कमांडने दिली. अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहारीन, कुवेत, कतार, जॉर्डन आणि ओमान या देशांवर हल्ले केले. या हल्ल्यांत जॉर्डनमधील नियंत्रण कक्ष, ड्रोन ठेवण्याचे ठिकाण, कुवेतमधील अमेरिकेचे रडार केंद्र, ओमानमधील अमेरिकेच्या विमानवाहू नौकांना सहाय्यभूत ठरणारी यंत्रणा, कतारमधील विमानांची देखभाल करणारी यंत्रणा यांना लक्ष्य केल्याचे इराणने सांगितले. कतारमध्ये इराणच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले.

बहारीनमध्ये धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजले, तर ‘यूएई’मध्ये इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना निकामी केले. दोहा येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले. विशेष म्हणजे ओमानवर पहिल्यांदा अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला आहे. इराणच्या या कृत्याला ओमानने बेजबाबदार असे संबोधले आणि इराणच्या राजदूतांना बोलावून निषेध व्यक्त केला.

अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या ताब्यातील केशम बेटावर हल्ला केला. या बेटावर इराणचा लष्करी तळ असून तिथे डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. पर्शियन आखातातील या सर्वात मोठ्या बेटावर सुमारे दीड लाख नागरिक राहतात.

नौकेवरील हल्ल्यात एक भारतीय बेपत्ता

ओमानच्या किनार्‍याजवळ रविवारी सकाळी ‘जीएफएस गॅलक्सी’ या व्यावसायिक नौकेवर झालेल्या हल्ल्यात नौकेवरील सदस्यांपैकी एक भारतीय नागरिक बेपत्ता झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला. या नौकेवर एकूण २३ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी ११ भारतीय होते. १० भारतीयांची सुटका करण्यात आली, मात्र एक बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे ओमान प्रशासनाने सांगितले.

‘खामेनींच्या हत्येचा बदला घ्या’

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी शनिवारी त्यांचे पिता आणि इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याचे आवाहन केले. याबाबत त्यांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. मोजताबा खामेनी युद्ध सुरू झाल्यापासून सार्वजनिक ठिकाणी आलेले नाहीत.

ओमानमधील भारतीय दूतावास तेथील घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहे. व्यावसायिक नौकांवरील हल्ले चिंताजनक आहेत. या प्रदेशातील व्यावसायिक आणि नागरी सुविधांवरील हल्ले थांबायलाच हवेत. आंतरराष्ट्रीय समुद्रातून मुक्त आणि विनाअडथळा व्यापार लवकरात लवकर पुन्हा सुरू झाला पाहिजे. – परराष्ट्र मंत्रालय, भारत

एकतर्फी करार करण्याचे युग आता संपले आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळा; अन्यथा किंमत मोजा. –मोहंमद कालिबाफ, वाटाघाटी करणार्‍या इराणच्या शिष्टमंडळाचे प्रमुख