US-Iran Conflict Trump Reaction: President Trump speaks on military tension and diplomatic talks after fighter jet crash : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. या संघर्षादरम्यान इराणने अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता, आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले गेल्यामुळे सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच तणाव वाढलेला असूनही वाटाघाटी पुढे सुरू राहू शकतात, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प यांनी लढाऊ विमान पाडल्याच्या घटनेमुळे राजनैतिक चर्चेत अडथळा येण्याची शक्यता फेटाळून ळावली. या घडामोडींचा वाटाघाटींवर परिणाम होईल का, असे विचारले असता ते म्हणाले, “नाही, मुळीच नाही. नाही, हे युद्ध आहे. आपण युद्ध लढत आहोत.”

लष्करी मोहिम आणि पडद्यामागून होत असलेले मुत्सद्देगिरी प्रयत्न हे दोन्ही एकाच वेळी सुरू असताना, इराणनने अमेरिकेचे प्रगत लढाऊ विमान पाडल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे.

इराणमध्ये पाडण्यात आलेल्या अमेरिकन विमानाच्या वैमानिकासाठी राबवण्यात येत असलेल्या बचाव आणि शोध मोहिमेबद्दल अधिक माहिती देण्यास ट्रम्प यांनी नकार दिला. ही एक संवेदनशील मोहीम असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ट्रम्प यांनी संघर्ष काळातील मीडिया कव्हरेजबद्दलही नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष परिस्थितीची गुंतागुंत माध्यमांच्या रिपोर्टिंगमध्ये योग्य प्रकारे दिसून येत नसल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाडण्यात आलेल्या लढाऊ विमानातील एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसर्‍याचा शोध घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. इराणमध्ये पाडण्यात आलेले विमाना F-15E स्ट्राईक ईगल असल्याचे समोर आवले आहे, हे विमान साधारणपणे दोन जणांकडून चालवले जाते.

इराणने हे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारसी आहे. या विमानाला होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.

अमेरिका-इराण यांच्यातील वाढघाटी रघडल्या असून या पार्श्वभूमीवर या घडामोडी समोर आल्या आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इराणकडून नियोजित चर्चेला उपस्थित राहण्याच नकार देण्यात आल्यानंतर, युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने सुरू असलेली दोन देशांमधील चर्चा सध्या रखडली आहे. अमेरिकेने वाटाघाटी सुरू ठेवण्याचे संकेत दिलेले असतानाही इराणने कथितपणे तात्पुरत्या युद्धविरामाचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळला आहे.