दुबई, वॉशिंग्टन : अमेरिका, इराण, पाकिस्तानमधील प्रमुख नेते आणि इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाहीर वक्तव्यांवरून अमेरिका-इराणमध्ये कराराची चौकट खालील मुद्द्यांवर ठरली आहे. यामध्ये हेजबोला आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आणि ‘होर्मुझ’मधील व्यापारी वाहतूक टोलमुक्त ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंकडून तफावत आढळली आहे.
दरम्यान, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांनी संयुक्त निवेदन काढून अमेरिका-इराण कराराची चौकट तयार झाल्याच्या घोषणेचे स्वागत केले. इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा येतील आणि पडताळणी अधिक पारदर्शीपणे झाली, तर इराणवरील निर्बंध हटविण्याची आमची तयारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. चीननेही कराराचे स्वागत केले.
इराणच्या गोठविलेल्या निधीपैकी २५ अब्ज डॉलर खुले?
इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की अमेरिकेने इराणच्या गोठविलेल्या निधीपैकी २५ अब्ज डॉलर निधी खुला करणार आहे. तसेच, या करारानुसार, इराण अण्वस्त्रे तयार करू शकणार नाही. मात्र, देशांतर्गत पातळीवर युरेनियम कमी प्रमाणात समृद्ध करता येणार आहे. अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले, की या करारानंतर इराणमधील अणुकार्यक्रम, समृद्ध युरेनियम नष्ट केले जाणार आहे.
करारामध्ये काय?
– करारावर सही झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार आणि अमेरिकेची नाविक नाकेबंदी संपुष्टात येणार
– पुढील ६० दिवसांत इराणच्या अणुकार्यक्रमासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार
– इराण ओमानसह ‘होर्मुझ’मधील व्यावसायिक सागरी वाहतुकीचे नियमन करण्याचे वृत्त इराणच्या ‘फार्स’ वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेने मुक्त व्यापारी वाहतूक सुरू राहील, असे म्हटले आहे.
– अण्वस्त्रांचे उत्पादन किंवा खरेदी इराण करणार नाही.
– इराण देशांतर्गत पातळीवरच समृद्ध युरेनियमचा साठा कमी करील.
– कुठलाही करार झाला, तरी त्याची पडताळणी अतिशय कठोरपणे होणार असल्याचे ट्रम्प यांचे वक्तव्य. मात्र, या बाबतीत सविस्तर तपशील नाही.
– इराणबरोबरील कराराला अमेरिकेतील काँग्रेसमध्ये मंजुरी घ्यावी लागेल, असे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचे वक्तव्य
– अंतिम करार होईपर्यंत इराणवर कुठलेही नवे निर्बंध नाहीत.
– इराणवरील तेलाचे निर्बंध काही काळासाठी अमेरिका शिथिल करील आणि अंतिम करारानंतर अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघ इराणवरील सर्व निर्बंध निश्चित केलेल्या वेळेत उठवतील.
– इराणच्या अमेरिकेने गोठविलेल्या मालमत्तेमधील २५ अब्ज डॉलर अमेरिका खुली करणार. रोख निधी, प्रादेशिक देशांचे सहकार्य आणि क्रेडिट लाइनच्या माध्यमातून हा निधी देणार.
– अमेरिका आणि पश्चिम आशियातील अमेरिकेचे मित्रदेश मिळून इराणच्या विकासाचा आराखडा तयार करणार. पुढील ६० दिवसांत त्याला मान्यता मिळणार.
– लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाई संपुष्टात आल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य. इराणकडूनही दुजोरा. इस्रायल-हेजबोलाकडून अद्याप अमेरिका-इराण करारावर प्रतिक्रिया नाही.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना चिवट प्रत्युत्तर
अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध २८ फेब्रुवारी रोजी हल्ला करून युद्धाला तोंड फोडले. तेव्हा काही दिवसांत हे युद्ध संपेल, असा कयास बांधला जात असताना इराणच्या चिवट प्रत्युत्तरांमुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी केल्यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढून त्याचे चटके साऱ्या जगाला बसले. अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराणनेही पश्चिम आशियातील बहारीन, कुवेत, सौदी अरेबिया आदी देशांतील अमेरिकी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले.
इस्रायलचे अगदी कराराची घोषणा होण्यापूर्वीपर्यंत लेबनॉनमधील हेजबोलाविरोधातील हल्ले शांतता प्रक्रियेतील सर्वांत मोठा अडथळा ठरला. लेबनॉनमधील लाखो लोकांना या युद्धाचा फटका बसला. अमेरिका-इराणमध्ये ८ एप्रिल रोजी तात्पुरता युद्धविराम झाल्यानंतरही तणाव कायम होता. या काळात ट्रम्प यांची सातत्याने परस्परविरोधी वक्तव्ये चर्चेत राहिली.
ट्रम्प यांना स्थानिक पातळीवरून होणारा विरोध, ट्रम्प-नेतान्याहू यांच्यातील तणाव, अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना न जुमानणारा इराण, पाकिस्तानसह पश्चिम आशियातील इतर देशांची मध्यस्थी, शेअर बाजार आणि तेलाच्या किमतींमधील मोठे हेलकावे, हजारो लोकांचा बळी आणि भारतासह इतर अनेक देशांना मोठी आर्थिक झळ आदी घडामोडींनंतर संघर्ष संपल्याची अधिकृत घोषणा झाली. या घडामोडीचे जगातील साऱ्या देशांनीच स्वागत केले आणि पुन्हा या शांततेचा भंग होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भारतीय जहाज सुरक्षितपणे बाहेर
नवी दिल्ली : भारताचे दिशा हे ‘एलएनजी’वाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष युद्धक्षेत्रातून बाहेर पडलेले हे पहिले भारतीय ‘एलएनजी’वाहू जहाज आहे. दिशा या जहाजाचे व्यवस्थापन ‘शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेड ऑफ इंडिया’च्या नेतृत्वाखालील समूहाकडून केले जाते. त्यामध्ये ६२ हजार ३७० मेट्रिक टन द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) असल्याची माहिती जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सोमवारी दिली. ते १८ जूनपर्यंत भारताच्या दाहेज बंदर येथे पोहोचेल, असे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी सांगितले.
ठळक घटनाक्रम
२८ फेब्रुवारी – अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला, हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी आणि इतर उच्च लष्करी गुप्तचर विभागाचे अधिकारी ठार.
१ मार्च – प्रत्युत्तरादाखल इराणचे इस्रायल आणि पश्चिम आशियातील कतार, कुवेत आणि ‘यूएई’मधील अमेरिकी तळांवर हल्ले, इराणी ड्रोनच्या हल्ल्यात कुवेतमध्ये अमेरिकेचे सहा सैनिक ठार. इराण समर्थित हेजबोला गटाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले
४ मार्च – इराणी नौदलाची लढाऊ नौका ‘आयआरआयएस देना’ अमेरिकी नौदलाच्या हल्ल्यात हिंद महासागरात बुडाली
६-७ मार्च – बिनशर्त शरणागती पत्करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी इराणने फेटाळली
८ मार्च – सौदी अरेबियाच्या निवासी भागात प्रोजेक्टाइल पडले, एका भारतीयासह दोघांचा मृत्यू
९ मार्च – अयातोल्ला मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड
१३ मार्च – इराणचे सर्वात मोठे तेलनिर्यातीचे केंद्र असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेचे अनेक बॉम्बहल्ले
१७ मार्च – अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संलग्न असलेल्या बसिज गटाचे प्रमुख गोलामरझा सोलेमनी ठार
१८ मार्च – इस्रायलचा इराणचे ७० ते ७५ टक्के नैसर्गिक वायू उत्पादन करणाऱ्या साउथ पार्स वायूक्षेत्रावर हल्ला, इराणच्या गुप्तचर खात्याचे मंत्री इस्माइल खातिब यांची हत्या
२० मार्च – १८ मार्चच्या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियातील भारतीयाचा मृत्यू झाल्याचे भारतीय दूतावासाने जाहीर केले
२१ मार्च – समुद्रात अडकलेल्या इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध तात्पुरते हटवण्याची अमेरिकेची घोषणा
२३ मार्च – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा
२७ मार्च – इराणच्या अणुप्रकल्पांवर इस्रायलचे हल्ले
३० मार्च – लवकर युद्धसमाप्तीचा करार झाला नाही तर इराणचे ऊर्जास्रोत नष्ट करण्याची ट्रम्प यांची धमकी; कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
३१ मार्च – युद्धसमाप्तीसाठी चीन आणि पाकिस्तानचा पंचसूत्री प्रस्ताव
३ एप्रिल – इराणने अमेरिकेच्या हवाई दलाचे एफ-१५ई हे लढाऊ विमान पाडले
७ एप्रिल होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंबंधी करार न केल्यास इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची ट्रम्प यांची धमकी
८ एप्रिल – इराण आणि अमेरिकेदरम्यान दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार
११ एप्रिल – अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळाची पाकिस्तानात इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समोरासमोर ऐतिहासिक चर्चा
१२ एप्रिल – पाकिस्तानातील चर्चेत शांतता करारास अपयश, इराणी बंदरांच्या नाकेबंदीची ट्रम्प यांची घोषणा
१६ एप्रिल – पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची तेहरानमध्ये इराणच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
२० एप्रिल – होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणचा ध्वज असलेले मालवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात
२१ एप्रिल – अमेरिकेच्या वाटाघाटींच्या प्रस्तावाला इराणने उत्तर न दिल्यामुळे व्हान्स यांची इस्लामाबाद भेट रद्द
२२ एप्रिल – ट्रम्प यांच्याकडून इराणबरोबरच्या शस्त्रसंधीत बेमुदत वाढ, इराणचा तीन जहाजांवर गोळीबार आणि दोन जहाजांवर ताबा
२४ एप्रिल – शस्त्रसंधीवर पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची इस्लामाबादमध्ये दाखल
२६ एप्रिल – अराघची इस्लामाबादमध्ये दुसऱ्यांदा दाखल, रशियाला जाण्यापूर्वी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा
१ मे – युद्धसमाप्तासाठी इराणचा अमेरिकेकडे पहिला प्रस्ताव
८ मे – अमेरिकी सैन्याने होर्मुझमध्ये गोळीबार करून दोन भारतीय तेलवाहू जहाज निकामी केले
१३ मे – ओमानच्या किनाऱ्याजवळ भारताचा ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला
१८ मे – गंभीर चर्चा सुरू असल्यामुळे इराणवरील लष्करी हल्ले थोपवत असल्याची ट्रम्प यांची घोषणा
२४ मे – इराणबरोबर करार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यावरही चर्चा
२६ मे – आत्मसंरक्षणासाठी इराणवर हल्ले केल्याची अमेरिकी लष्कराची घोषणा
१ जून – इराणने अमेरिकेचे ‘एमक्यू-१ प्रिडेटर’ ड्रोन पाडले
३ जून – इराणी ड्रोनचा कुवेतच्या विमानतळावर हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू
८ जून – इस्रायल आणि इराणचे परस्परांवर हल्ले, युद्ध पुन्हा भडकण्याची भीती
९ जून – इराणने अमेरिकी लष्कराचे लढाऊ हेलिकॉप्टर पाडले, प्रत्युत्तर देण्याचा ट्रम्प यांचा आदेश
१० जून – अमेरिकेचे इराणवर हल्ले, पलाऊचा ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला, तीन भारतीय नाविकांचा मृत्यू
११ जून – अमेरिकेचे दुसऱ्या दिवशीही इराणवर हल्ले, इराणचे आखाती देश आणि जॉर्डनवर हल्ले १५ जून – युद्धसमाप्तीसाठी शस्त्रसंधी झाल्याची ट्रम्प यांची घोषणा
