इस्लामाबाद : पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये थेट वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये १९७९ नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची चर्चा होत असल्याने अवघ्या जगाचे याकडे लक्ष लागले आहे. चर्चेच्या पहिल्या फेरीत, शनिवारी कोणताही मुख्य तोडगा निघू शकला नसला तरी, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण हा वाटाघाटीत कळीचा मुद्दा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुश्नर यांच्याबरोबर इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री सयद अब्बास अराघची यांच्यात दोन तास चर्चा झाली, अशी माहिती पाकिस्तानातील एका सूत्राने दिली.

या चर्चेत काय झाले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, इराणमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि इराणच्या गोठवलेल्या संपत्ती मुक्त करणे, युद्धाची नुकसान भरपाई आणि संपूर्ण पश्चिम आशियात शस्त्रसंधी लागू करणे अशा प्राथमिक अटी इराणने घातल्या आहेत. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर हेही उपस्थित होते. दोन्ही देशांतील चर्चा रविवारीही सुरूच राहील, असे सांगण्यात आले.

तत्पूर्वी, दोन्ही प्रतिनिधी मंडळांची प्रत्यक्ष चर्चा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही बाजूंशी स्वतंत्र चर्चा केली. या भेटीमध्ये संभाव्य वाटाघाटींची वेळ आणि पद्धत या बाबी निश्चित करण्याविषयी चर्चा झाली, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले. इराणने आपल्या महत्त्वाच्या अटी शरीफ यांना सांगितल्या आहेत. इराण लेबनॉनमध्येही युद्धविरामाची मागणी करत आहे. इस्रायल आणि लेबनॉनचे अधिकारी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

चर्चा सुरू झाली तेव्हा काय करार झाले याबद्दल परस्परविरोधी माहिती समोर येत होती. इराणच्या एका वरिष्ठ सूत्राने वृत्तसंस्थांना सांगितले की, अमेरिकेने इराणची कतार आणि इतर परदेशी बँकांमधील गोठवलेली संपत्ती मुक्त करण्याचे मान्य केले आहे. पण अमेरिकेच्या अधिकार्‍याने तातडीने या दाव्याचे खंडन केले. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

चर्चेदरम्यान गंभीर मतभेद

सामुद्रधुनी खुली करण्यावरून गंभीर मतभेद असल्याचे वृत्त इराणच्या निमसरकारी माध्यमांनी शनिवारी दिले. या चर्चेत तोडगा निघू शकला नाही, असे या माध्यमांनी सांगितले.

इराणी लोकांना हे लक्षात येत नाही की, आंतरराष्ट्रीय जलमार्गाचा वापर करून ते अल्पमुदतीसाठी जगाकडून खंडणी वसूल करण्याशिवाय त्यांच्याकडे वाटाघाटी करायला मुद्दे नाहीत. ते केवळ वाटाघाटी करण्यासाठी जिवंत आहेत! – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका