रॉयटर्स, वॉशिंग्टन / दुबई / इस्लामाबाद

होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्यासाठी अमेरिका ‘मॅरिटाइम फ्रीडम कन्स्ट्रक्ट’ (एमएफसी) नावाची नवी आंतरराष्ट्रीय आघाडी तयार करण्याचे नियोजन करीत आहे. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. तेलपुरवठा सुरळीत नसल्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

‘होर्मुझ’ बंद असल्याने जगातील एक पंचमांश तेल आणि गॅसपुरवठा विस्कळीत झाला आहे. जागतिक ऊर्जाबाजारातील किमती वाढल्यामुळे चिंता उत्पन्न झाली आहे. अमेरिकेने नौदल नाकेबंदी केल्याच्या निषेधार्ह इराणने सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर नव्याने हल्ले सुरू करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त ‘ॲक्सिऑस’ या वृत्तसंकेतस्थळाने बुधवारी रात्री उशिरा दिले.

इराणबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर तेलाच्या किमती आतापर्यंत दुप्पट झाल्या आहेत. याचे पडसाद साऱ्या जगाला बसत आहेत. अमेरिकेच्या नाकेबंदीविरोधात इराणने लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे झाले, तर अमेरिकेचेही पुन्हा हल्ले सुरू होऊन पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी चिघळण्याचा धोका आहे.

अमेरिकेपुढे पर्याय?

‘ॲक्सिऑस’वरील वृत्तानुसार, ट्रम्प यांच्यासमोर होर्मुझ सामुद्रधुनीचा काही भाग ताब्यात घेऊन तो व्यावसायिक वाहतुकीसाठी खुली करण्याचा पर्याय आहे. यासाठी अमेरिकी सैनिकांचा वापर अमेरिकेला करावा लागेल. याखेरीज, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका पत्रानुसार, अमेरिकेने ‘मॅरिटाइम फ्रीडम कन्स्ट्रक्ट’ नावाची नवी आघाडी तयार करून मित्रदेशांना त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही आघाडी होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करील. संघर्ष संपल्यानंतरचे सागरी सुरक्षा धोरण ही आघाडी आखेल. फ्रान्स, ब्रिटन अशा आघाडीमध्ये संघर्ष संपल्यानंतरच सहभागी होण्यास उत्सुक आहेत.

‘आण्विक, क्षेपणास्त्र क्षमतांचे रक्षण करू’

इराणचे सर्वोच्च प्रमुख मोजताबा खामेनी यांनी इराणची अणू आणि क्षेपणास्त्र क्षमतेचे संरक्षण करू, असे विधान केले आहे. अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाला केंद्रस्थानी ठेवून इराणवर करार करण्यासाठी दबाव टाकला आहे. खामेनी यांनी या बाबत निवेदन सादर केले आहे.

त्यात त्यांनी नमूद केले की, ‘देश आणि देशाबाहेरील ९ कोटी इराणी नागरिक इराणच्या अध्यात्मिक, मानवी, वैज्ञानिक, औद्योगिक, तंत्रज्ञानाच्या क्षमता, नॅनो तंत्रज्ञानापासून जैव तंत्रज्ञानापर्यंत आणि अणू आणि क्षेपणास्त्र क्षमतांना राष्ट्रीय मालमत्ता म्हणून मानतात. देशातील पाणी, जमीन, हवाई हद्दीचे जसे आम्ही संरक्षण करतो, तसेच या क्षमतांचे रक्षण करू.’

‘अमेरिकेची पर्शियन आखातात कुठे जागा असेल, तर ती समुद्राच्या तळाशी असेल. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आमचा ताबा आहे. पर्शियन आखाताचे भविष्य सुंदर असून, अमेरिकेविना ते असेल. जनतेच्या समुद्धीसाठी ते असेल. हजारो किलोमीटर अंतरावरून येथे लोभीपणापायी येणाऱ्यांना येथे कुठलेही स्थान नसेल.

हेग्सेथ-डेमोक्रॅटिक नेत्यांमध्ये खडाजंगी

पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेथ यांची अमेरिकी काँग्रेसच्या लष्करी सेवा समितीसमोर झालेल्या सुनावणीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांबरोबर चांगलीच खडाजंगी झाली. इराण युद्धावरून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करीत असल्याचे आरोप हेग्सेथ यांनी फेटाळले.

हेग्सेथ यांची समितीपुढे सहा तास सुनावणी झाली. ट्रम्प प्रशासनाच्या दीड लाख कोटी डॉलरच्या संरक्षण अर्थसंकल्पावर यामध्ये सुनावणी झाली. इराणबरोबर युद्ध सुरू केल्यानंतर प्रथमच हेग्सेथ अमेरिकी काँग्रेससमोर आले. पेंटागॉनमधील अधिकाऱ्यांनी इराणबरोबर झालेल्या युद्धावर आतापर्यंत २५ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च झाल्याची माहिती दिली. या रकमेवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना संशय आला. अध्यक्षपदाचे काम करण्यासाठी ट्रम्प मानसिकदृष्ट्या स्थिर आहेत का, असा सवालही त्यांनी विचारला. विरोधकांचे सर्व आरोप हेग्सेथ यांनी फेटाळून लावले.