US-Iran Peace Talks Update: अमेरिका आणि इराण यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेवर अनिश्तितचे सावट निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये येत असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. पण, इराणने आता “दबावाखाली कोणतीही चर्चा करणार नाही” अशी भूमिका घेतल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्यास नकार दिल्याने तणाव वाढला आहे.

इराणचा अमेरिकेला इशारा

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम बुधवारी समाप्त होत आहे. ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये बुधवारी इस्लामाबाद येथे चर्चा होणे अपेक्षित होते. पण, “इराण धमक्यांच्या छायेत कोणतीही चर्चा मान्य करणार नाही”, असे इराणी संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले आहे. “इराण आता रणांगणावर आपली नवीन कार्डे खेळण्यासाठी सज्ज आहे. अमेरिकेला हा शांतता करार म्हणजे शरणागतीचा करार बनवायचा आहे, जो इराणला मान्य नाही”, असे गालिबाफ यांनी म्हटले आहे.

सौम्य भूमिका घेणार नाही – ट्रम्प

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत, “आता यापुढे सौम्य भूमिका घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर याबाबत पोस्ट केली आहे. “इराणने हा करार मान्य केला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक पॉवर प्लांट (विद्युत केंद्र) आणि प्रत्येक पूल नष्ट करेल. यापुढे सौम्य भूमिका घेणार नाही,” असे ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. ट्रम्प यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठविण्यासाठी अजून तयार असल्याचेही स्पष्ट केले.

युद्धविरामाचा अखेरचा दिवस

दोन्ही देशांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सध्याचा तात्पुरता युद्धविराम उद्या म्हणजेच बुधवारी संपत आहे. युद्धविराम वाढवण्यास उत्सुक नाही, असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “इराणचे कोणतेही शिष्टमंडळ अद्याप इस्लामाबादला गेलेले नाही,” असे इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दावा केला आहे. पण, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स अजूनही चर्चेसाठी तयार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.

जीवितहानीची भीषण आकडेवारी

या संघर्षामुळे इराणमध्ये किमान ३,३७५ जणांचा मृत्यू झाला असून, लेबनॉनमध्ये २,२९० हून अधिक मृत्यू झाले आहेत. इस्रायलमध्ये २३ मृत्यू (१५ सैनिकांचा समावेश आहे) तर अमेरिकेत १३ अमेरिकन लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.