US Iran New Conditions: अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यात झालेली शांतीवार्ता निष्फळ ठरल्यानंतर आता चर्चेची दुसरी फेरी कधी होणार? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. उभय देशात इस्लामाबाद येथे होणारी चर्चा याच आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, ही चर्चा सुरु होण्यापूर्वी अमेरिकेने इराणसमोर नव्याने काही अटी ठेवल्या आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनी कळीचा मुद्दा

“आम्ही योग्य लोकांच्या संपर्कात आहोत. लवकरच या विषयावर तोडगा निघेल”, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क पोस्टशी बोलताना सांगितले. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदी सुरु केल्याने जगावर पुन्हा एकदा इंधन आणि गॅस तुटवड्याचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकी नैदलाने होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या संघर्षात नवा ट्विस्ट आला आहे. होर्मुझबाबत अमेरिका आणि इराणने मांडलेल्या पूर्वीच्या भूमिकेवर दोन्ही देश ठाम असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या अटी नेमक्या काय आहेत?

अमेरिकेने पुन्हा एकदा त्यांची बाजू मांडताना होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. होर्मुझ सुरक्षित आणि पूर्णपणे वाहतुकीसाठी खुली करण्याचा अमेरिकेचा आग्रह आहे. होर्मुझ नाकेबंदीतून इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अमेरिका करत असल्याचे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेबरोबर होणाऱ्या कुठल्याही कराराला इराणच्या आयआरजीसीकडून संपूर्ण संमती हवी, अशीही अट अमेरिकेने इराणसमोर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इराणकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चर्चेची पहिली फेरी निष्फळ

गेल्या आठवड्यात इस्लामाबाद येथे झालेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरुन वाटाघाटी फिस्कटली होती. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळ प्रतिनिधींमध्ये वाटाघाटी दरम्यान जोरदार खडाजंगी झाल्याची देखील माहिती समोर आली होती. इराणमध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम नेतृत्वच शिल्लक नसल्याचेही उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी अधोरेखित केले. इराणच्या शिष्टमंडळात निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे दिसून आले, असे व्हान्स यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

जे. डी. व्हान्स काय म्हणाले?

“इराणला अमेरिकेच्या अटी/ प्रस्ताव मान्य करण्यासाठी सर्वोच्च नेता किंवा वरिष्ठ पातळीवरील नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळणे आवश्यक आहे. अमेरिकेने अनेक गोष्टी इराणसमोर मांडल्या आहेत, आता त्यांना निर्णय घ्यायचा आहे”, असेही व्हान्स म्हणाले.