US Iran nuclear deal negotiations : इस्लामाबादमध्ये तब्बल २१ तास चाललेल्या चर्चेत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. इराणने अणुकार्यक्रमाला किती काळ स्थगिती द्यावी, या मुद्द्यावर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद कायम असल्याचे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला अधिकाऱ्यांनी सांगितले. या चर्चेत दोन्ही बाजूंनी अणूप्रकल्प स्थगित करण्याबाबत प्रस्ताव मांडले, मात्र कराराच्या कालावधीवरून त्यांच्यात मोठी दरी आहे. इराणने युरेनियम संवर्धन पाच वर्षांपर्यंत थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन २० वर्षांच्या स्थगितीसाठी आग्रही आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दोन्ही देशांच्या विचारांत मतभेद
युद्धविराम झाल्यानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे शिष्टमंडळांनी दीर्घ चर्चा केली. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. मात्र, तरीही पुढील चर्चेचा मार्ग खुला असल्याचे संकेत मिळत आहेत. चर्चेची पुढची फेरी होण्याची शक्यता असली तरी अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांनी पाकिस्तान सोडण्यापूर्वी सांगितले की, दोन्ही बाजूंमध्ये अजूनही मोठे अंतर आहे. “आमच्या विचारांत खूप तफावत आहे… केवळ आताच नाही, तर खूप आधी पासूनच आमची मते जुळत नाहीत,” असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणच्या अणूप्रकल्पावर कायमस्वरूपी बंदी घालण्याऐवजी २० वर्षांच्या स्थगितीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय करारांतर्गत अणुइंधन तयार करण्याचा आपला अधिकार इराणला सोडवा लागणार नाही. मात्र, इराणने पुन्हा एकदा कमी कालावधीच्या स्थगितीचा प्रस्ताव मांडला आहे. यापूर्वीही असे प्रस्ताव अपयशी ठरल्याने तणाव वाढला होता. इराणने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या बंदरांना लक्ष्य केले गेले, तर कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही. दरम्यान, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील जहाजांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो, त्यामुळे गेल्या काही आठवड्यांत तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
अणूप्रकल्प सोडण्यास इराणकडून नकार
इराणने अण्वस्त्रे तयार करू नयेत, ही वॉशिंग्टनची मुख्य अट आहे. अमेरिकेला इराणच्या अणूप्रकल्पावर दीर्घकालीन हमी आणि कडक तपासणी हवी आहे. तसेच, समृद्ध युरेनियमवर नियंत्रण आणि कराराच्या पालनाची पडताळणी करणारी यंत्रणा असावी, असा अमेरिकेचा आग्रह आहे. याशिवाय कोणताही करार विश्वसनीय नसेल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, इराणने आपला अणूप्रकल्प पूर्णपणे सोडण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अणुइंधन तयार करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे इराणचे म्हणणे आहे. तसेच, आपले अणूप्रकल्प मोडीत काढण्यास किंवा अणू साठा परदेशात पाठवण्यासही इराणने विरोध केला आहे.
दोन्ही बाजूंमध्ये मतभेद असले, तरी स्थगितीच्या कालावधीवर चर्चा होणे हे काही प्रमाणात सकारात्मक पाऊल मानले जात आहे. लवकरच पुढील चर्चेची फेरी पार पडू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
