Mohammad Baqer Qalibaf Hormuz formula: अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये झालेली शांतीवार्ता निष्फळ ठरली. चर्चेच्या पहिल्याच फेरीत झालेल्या वाटाघाटीतून काही तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून आक्रमक भूमिका घेताना दिसत असून, हाच चर्चेतील कळीचा मुद्दा ठरला आहे. इराणकडून चर्चेत सहभागी झालेल्या शिष्टमंडळातील संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी आता अमेरिकेला होर्मुझवरुन इशारा देण्यासाठी थेट गणिती सूत्राचा वापर केला आहे.
इराणच्या संसद अध्यक्षांचा इशारा
अमेरिकेच्या लष्कराने आज रात्री ७.३० वाजल्यापासून इराणशी निगडीत सागरी वाहतुकीवर नाकेबंदी लागू करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे होर्मुझवरुन दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. अमेरिकेने नाकेंबदीचा इशारा दिल्यानंतर संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी देखील सूचक वक्तव्य करुन जगाच्या तेल किंमती आणि इतर बाबींवर कसा परिणाम होईल यावर भाष्य केले आहे. नाकेबंदीमुळे अमेरिकेला देखील याचा मोठा फटका बसण्याचा धोका त्यांनी व्यकत केला. सहाजिकच आर्थिक नुकसान होईल, असेही गालिबाफ यांनी म्हटले आहे.
एक्सवर शेअर केली पोस्ट
गालिबाफ यांनी एक गुगल मॅप्सची इमेज आणि त्यावर व्हाईट हाऊस जवळील गॅस स्टेशन असे सर्च करण्यात आले आहे, असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी सध्याच्या इंधन दरांचा उल्लेख केला आहे. तसेच, भविष्यात तणाव वाढला तर इंधनाच्या किंमती वाढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तणाव वाढल्यास चार ते पाच प्रति गॅलन इंधनाचा दर वाढेल, असा इशारा गालिबाफ यांनी दिला आहे. गालिबाफ यांनी या पोस्टमध्ये एक गणिती सूत्र देखील सांगितले आहे.
गणित सूत्राचा अर्थ काय?
ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O) असे सूत्र गालिबाफ यांनी शेअर केले आहे. ΔO_BSOH अभियांत्रिकी भाषेत याचे विश्लेषण केले असता याचा अर्थ होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यास त्याचा तेल वाहतूक आणि किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता दर्शवतो. यामुळे सुरुवातीला असणारी बाजारभाव उदा. f(O) अधिकपटीने f(f(O)) वाढण्याची भीती गालिबाफ यांनी व्यक्त केली आहे. थोडक्यात होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदीचा विचार केल्यास त्यामुळे तेलाचे भाव वाढतीलच शिवाय याचे अमेरिकेतही परिणाम दिसून येतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
नाकेबंदीचा इशारा
पाकिस्तानमधील चर्चेतून हाती काही न लागल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी करण्याचा इशारा दिला आहे. आज रात्री सात वाजल्यापासून अमेरिका इराणच्या समुद्री वाहतुकीच्या प्रमुख मार्गांवर नाकेबंदी करणार आहे. इराणचे बंदर सोडून जाणाऱ्या आणि आत येणाऱ्या जहाजांसाठी हा नियम लागू असेल, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षातील महत्वाच्या ठरलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरुन आता नव्याने वाद उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
