US Iran Peace Deal updates: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर युद्धाचे ढग जमा झाले होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक एक मोठा निर्णय घेत इराणवरील संभाव्य हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले मागे घेतले आहेत. इराणसोबत एका ‘ऐतिहासिक करारावर’ स्वाक्षरी होणार असून, त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘हार्मुझची सामुद्रधुनी’ व्यापारासाठी पूर्णपणे खुली केली जाईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या आठवड्याअखेर किंवा सोमवारी युरोपमध्ये या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
‘ट्रुथ सोशल’वरून ट्रम्प यांची मोठी घोषणा!
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटवरून या घडामोडींची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले:
“इराणच्या सर्वोच्च नेतृत्वासोबतची आमची चर्चा आता अंतिम आणि सर्वोच्च पातळीवर पोहोचली असून, त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी आज संध्याकाळी इराणवर होणारे नियोजित हवाई आणि बॉम्ब हल्ले रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.”
इराणचे प्रमुख तेल प्रकल्प आणि ‘खर्ग बेट’ ट्रम्प यांच्या निशाण्यावर होते. मात्र, ऐनवेळी लष्करी कारवाई थांबवून अमेरिकेने मुत्सद्देगिरीला प्राधान्य दिले आहे.
या आठवड्याअखेर युरोपमध्ये कराराची शक्यता
ओव्हल ऑफिसमधून प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतच्या युद्धाचा धोका आता टळला असून दोन्ही देशांमध्ये एक मोठा समझोता झाला आहे.
- कराराची जागा: या ऐतिहासिक करारावर बहुधा युरोपमध्ये स्वाक्षरी होईल.
- प्रतिनिधित्व: या सोहळ्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ उपस्थित राहतील.
- आर्थिक परिणाम: “हा करार अंतिम होताच कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील आणि त्याचा सकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
“इराण कधीही अणुबॉम्ब बनवू शकणार नाही”
या कराराच्या मुख्य उद्देशावर बोलताना ट्रम्प म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या करारानंतर इराण कधीही अणुबॉम्ब तयार करू शकणार नाही. यासाठीच आम्ही एवढे प्रयत्न करत होतो. कराराची कागदपत्रे अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल.”
यासोबतच ट्रम्प यांनी एक खळबळजनक खुलासाही केला. गेल्या महिनाभरात अमेरिकन सैन्याने रात्रीच्या अंधारात इराणच्या अनेक मोठ्या जहाजांना गुप्तपणे लक्ष्य केले होते. “आम्ही इराणचे रडार नेटवर्क उद्ध्वस्त केले होते, ज्यामुळे आमच्या कारवाया त्यांना समजू शकल्या नाहीत. आता करार होताच हार्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरक्षित आणि खुली होईल,” असे ट्रम्प म्हणाले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची प्रतिक्रिया
अमेरिका आणि इराणमधील या संभाव्य करारानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या करारात इस्रायल थेट सहभागी नसला, तरी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार…
“अंतिम करारामध्ये इराणकडील संवर्धित युरेनियम नष्ट करणे, अणू पायाभूत सुविधा मोडीत काढणे, क्षेपणास्त्र निर्मितीवर मर्यादा आणणे आणि प्रादेशिक दहशतवादी संघटनांना इराणकडून मिळणारा पाठिंबा पूर्णपणे बंद करणे, या अटींचा समावेश असावा या अमेरिकेच्या भूमिकेला इस्रायलचा पाठिंबा आहे.”
कराराबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही” – इराणची भूमिका
दुसरीकडे, इराणने या करारावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने इराणच्या ‘इर्ना’ या वृत्तसंस्थेच्या संर्दभाने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस्माईल बघाई यांनी सांगितले की, “अमेरिकेसोबतच्या कराराबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.”
कराराची वेळ आणि ठिकाणाबाबत पसरत असलेल्या बातम्या केवळ तर्कवितर्क आहेत. कराराचा मोठा भाग तयार झाला असला, तरी चर्चेदरम्यान अमेरिकेने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. इराण आपल्या ‘रेड लाईन्स’ म्हणजेच सार्वभौमत्वाच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड करणार नाही, असे बघाई यांनी स्पष्ट केले आहे.
