इस्लामाबाद, वॉशिंग्टन, तेल अविव : आखातातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण सामंजस्य कराराच्या अगदी जवळ आले आहेत. अमेरिकेने इराणसमोर नवा प्रस्ताव ठेवला असून, त्यावर इराण विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४ कलमी आणि एका पानाचा हा प्रस्ताव असून, त्याद्वारे युद्ध अधिकृतपणे समाप्त होईल. यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे, अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवणे आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर मर्यादा आणणे या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
पाकिस्तानने या युद्धातील शांतता चर्चेचे यजमानपद भूषवले असून, दोन्ही देशांमधील निरोप पोहोचवण्याचे ते मुख्य माध्यम राहिले आहे. त्यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्रालय लवकरच पाकिस्तानद्वारे आपला प्रतिसाद कळवेल, असे इराण परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दोन्ही देशांतील सामंजस्य करारानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणार्या जहाज वाहतुकीवरील बंदी उठवणे, इराणवरील अमेरिकेचे निर्बंध हटवणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंध घालण्यास सहमती दर्शवणे यावर चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जॅरेड कुशनर या वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत. प्राथमिक करारावर सहमती झाल्यास, पूर्ण करारापर्यंत पोहोचण्यासाठी ३० दिवसांच्या सविस्तर चर्चेचा कालावधी सुरू होईल. दरम्यान, इराणचा अणू कार्यक्रम यांसारखे कठीण विषय बाजूला ठेवून युद्ध थांबवण्यावर भर दिला जात आहे.
‘होर्मुझ’ लवकरात लवकर खुली करा : चीन
बीजिंग : अण्वस्त्रे विकसित न करण्याच्या इराणच्या वचनबद्धतेचे स्वागत करत, चीनने बुधवारी इराणला हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली करण्याचे आवाहन केले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी बीजिंगमध्ये चर्चा केली. ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पुन्हा सामान्य आणि सुरक्षित व्हावी, ही संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा आहे. इराणने या मागणीला लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद द्यावा,’ अशी चीनची अपेक्षा असल्याचे वांग यी म्हणाले.
रुबिओ यांची घोषणा
‘२८ फेब्रुवारीला सुरू झालेले ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आता संपले आहे’, अशी घोषण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मंगळवारी केली. त्याचवेळी इराणला त्यांच्या जागतिक एकाकीपणाची जाणीव करून द्यावी, अशी विनंतीही रुबिओ यांनी चीनला केली. चीनची निर्यातप्रधान अर्थव्यवस्था होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून असल्याने, हा मार्ग खुला होणे चीनच्या हिताचेच आहे. पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करत असून, चीनदेखील पाकिस्तानला यात मदत करत असल्याचे समजते.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण
संभाव्य कराराच्या वृत्तामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ११ टक्के घसरण होऊन ती ९८ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. ऊर्जा पुरवठा सुरळीत होण्याच्या आशेने जागतिक शेअर बाजारातही बुधवारी तेजी पाहायला मिळाली.
ट्रम्प यांची पुन्हा धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जर इराणने युद्धविरामाच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू केले जातील, असा इशारा दिला आहे. ‘इराणने अटींचे पालन करण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ संपुष्टात येईल. तसेच, अत्यंत प्रभावी ठरलेली नाकेबंदी उठवल्यामुळे होर्मुझची सामुद्रध्रुनी इराणसह सर्वांसाठी खुली होईल. जर त्यांनी हे (अटी) मान्य केले नाही, तर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू होतील. दुर्दैवाने ते आधीच्या तुलनेत आणखी तीव्र असतील,’ असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका संदेशात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या विनंतीनंतर निर्णय
अमेरिकेने होर्मुझच्या नाकेबंदीतून मार्ग काढण्यासाठी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ ही मोहीम सुरू केली होती. पण यातून तणाव वाढला आणि इराण आक्रमक बनला. त्यामुळे युद्धविरामही धोक्यात आला होता. ही मोहीम स्थगित करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर जाहीर केले. पाकिस्तानच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. इराण युद्ध संपवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानच्या भूमिकेचे महत्त्व यातून विशद झाले. आज ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीनिमित्त त्यावेळच्या दु:खद परिस्थितीचे स्मरण करत असताना, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे काय झाले असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
