पीटीआय, तेहरान
पश्चिम आशियातील युद्धबंदीसाठी इस्लामाबादमध्ये झालेली अमेरिका-इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही तोडग्याविना संपल्यानंतर पाकिस्तानने आता चर्चेच्या दुसर्या फेरीसाठी पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर बुधवारी तेहरानमध्ये दाखल असून अमेरिका-इराण यांच्यातील शांतता वाटाघाटी पुन्हा पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
लष्करप्रमुख मुनीर यांच्यासह पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांचे शिष्टमंडळ अमेरिकेकडून नवा संदेश घेऊन आले असून त्यांचा उद्देश चर्चेच्या उच्चस्तरीय वाटाघाटींची दुसरी फेरी सुरू करणे हा असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरील युद्ध लवकर संपू शकते, दोन दिवस वाट बघा, असे वक्तव्य केले आहे. अमेरिका-इराणमधील युद्धविरामाची मुदत वाढविण्याची गरज नसल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले. ‘हे सारे लवकरच संपेल,’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी अन्य एका मुलाखतीमध्ये दिली. दोन्ही देशांमध्ये या आठवडाअखेर चर्चा होण्याचे संकेत सूत्रांनी मंगळवारीच दिले आहेत. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने मात्र चर्चेसाठी अद्याप कोणतीही विशिष्ट तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे नमूद केले.
चर्चेची दुसरी फेरी युरोपमध्ये करण्याकडे आधी कल होता. मात्र सात आठवड्यांचा संघर्ष संपवण्यासाठी थेट वाटाघाटींच्या दुसर्या फेरीसाठी इस्लामाबाद हे अधिक संभाव्य ठिकाण असल्याचे अमेरिकी अध्यक्षांनी सांगितले.
इराणची धमकी
होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेने सुरू केलेली नाकेबंदी बेकायदा असल्याचे सांगत इराणने अमेरिकेला धमकी दिली. अमेरिकेने नौदल नाकेबंदीची ही बेकायदा कृती सुरू ठेवली आणि इराणच्या व्यापारी व तेलवाहू जहाजांना लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेची ही कृती शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची नांदी ठरेल, असे इराणने म्हटले आहे.
