वृत्तसंस्था, दुबई/वॉशिंग्टन
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष अनेक चढ-उतारांनंतर अखेर रविवारी अधिकृतपणे थांबला. १०७ दिवसांचे हे युद्ध संपविण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी सामंजस्य करार केला असून त्यावर डिजिटल स्वाक्षर्या करण्यात आल्या. या कराराची चौकट आणि त्यातील अटी-शर्ती मान्य असल्याचे दोन्ही देशांकडून सांगण्यात आले.
या करारानुसार, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी संघर्ष थांबणार असून, होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार आहे. इराणमधील आण्विक कार्यक्रमासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुढील ६० दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. या करारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी स्वाक्षरी केली. या करारानंतर युद्धसमाप्तीची घोषणा ट्रम्प यांनी केली.
ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी घसरल्या आणि शेअर बाजार वधारला. ‘इराणबरोबरील करार आता मार्गी लागला आहे,’ अशी टिप्पणी ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केली. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी करार झाल्याची घोषणा समाज माध्यमावर केली होती. हा करार होण्यामध्ये पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली.
शरीफ यांनी केलेल्या टिप्पणीत करार झाल्याचे सांगतानाच ‘लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तत्काळ आणि कायमस्वरूपी थांबविण्यात आल्या आहेत,’ असे म्हटले. ‘जी-७’ देशांची परिषद फ्रान्समध्ये होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प या वेळी करारातील तपशील सांगतील, अशी अपेक्षा आहे. कराराची घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी या प्रदेशात, लेबनॉनसह इतर ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन, अशी घोषणा केली. तसेच, इस्रायलचे लेबनॉनमध्ये आणि हेजबोलाचे इस्रायलवर पुन्हा हल्ले होणार नाहीत, अशीही टिप्पणी केली.
दोन महिन्यांत व्यापक चर्चा
या करारावर हेजबोला गटाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रविवारी रात्रीपासून हल्ले झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांनीदेखील लेबनॉनमधील इस्रायलचे हल्ले पूर्ण थांबायला हवेत, असे म्हटले असून, कराराच्या चौकटीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अमेरिकेची राहील, असे स्पष्ट केले आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझम घारीबाबादी यांनी सांगितले, की अमेरिका आणि इराणमध्ये अधिक व्यापक चर्चा पुढील ६० दिवसांत शस्त्रसंधी काळात होणार आहेत.
इस्रायलचे मौन
अमेरिका-इराण करारावर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या फौजांवर माघारी परतण्यासाठी कुठला दबाव आला, तर त्याला विरोध करू,अशी प्रतिक्रिया इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिली. त्यामुळे इस्रायल-हेझबोला हा नजीकच्या काळात शांतताभंगाचे कारण पुन्हा ठरण्याची शक्यता आहे.
‘होर्मुझ खुली; नाकेबंदी संपुष्टात
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याची माहिती देताना ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर सांगितले, ‘अमेरिका-इराण यांच्यात डिजिटल पद्धतीने करार झाल्याने आता तेलवाहू जहाजे मार्गस्थ झाली आहे. अमेरिकेची नाविक नाकेबंदी संपुष्टात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
तेलदरात घसरण
अमेरिका-इराण यांच्यात करार झाल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी तेलाचे दर तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. ब्रेंट क्रूड ३.६५ डॉलरने (४.२%) घसरून ८३.६८ डॉलर प्रति पिंप झाले, तर अमेरिकेचे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ४.१३ डॉलरने (४.९% ) घसरून ८०.७५ डॉलर प्रति पिंप झाले.
अमेरिका आणि इराणमध्ये पश्चिम आशियातील संघर्ष संपविण्यावर झालेले एकमत स्वागतार्ह आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
