वृत्तसंस्था, बेरुत, वॉशिंग्टन
होर्मुझची सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास करण्यासाठी इराणला शुल्क दिल्यास निर्बंध लागू केले जातील, असा इशारा अमेरिकेने जहाजकंपन्यांना दिला आहे. यूएस ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलने शुक्रवारी हा इशारा जारी केल्यामुळे पश्चिम आशियातील तणावात भर पडली आहे. दरम्यान, अमेरिकेने नाकारलेल्या प्रस्तावात अणुकरारावर चर्चा सुरू करण्यापूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव होता, अशी माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक जवळपास बंद केली. त्यानंतर त्यांनी जहाजवाहतुकीवर शुल्क आकारण्याची घोषणा केली. हे शुल्क रोकड, डिडिटल, ऑफसेट, अनौपचारिक देवाणघेवाण किंवा देणग्या आणि इराणच्या दूतावासांमध्ये देयकांसह अन्य प्रकारच्या देयकांच्या स्वरूपात स्वीकारले जाईल, असे इराणने जाहीर केले आहे. इराणच्या या कृतीला उत्तर म्हणून अमेरिकी नौदलाने १३ एप्रिलपासून इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे. आतापर्यंत ४५ व्यावसायिक जहाजे परत पाठवल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प आहे. या जलमार्गाने जगातील जवळपास २० टक्के कच्चे तेल आणि वायूची वाहतूक होते.
आम्ही जहाजे ताब्यात घेतली, आम्ही मालवाहू जहाजे ताब्यात घेतली, आम्ही तेल ताब्यात घेतले. हा फार फायदेशीर व्यवसाय आहे. आम्ही सागरी चाच्यांसारखे काम करत आहोत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव
तेहरान : डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळलेल्या प्रस्तावामध्ये अणुकरारावर चर्चा करण्यापूर्वी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव होता, असे इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. इराणने गुरुवारी पाकिस्तानमार्फत अमेरिकेला पाठवलेला चर्चेचा प्रस्ताव समाधानकारक नसल्याचे ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, प्रस्तावातील कोणत्या बाबी आपल्याला आवडल्या नाहीत, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
नोबेलविजेत्या नर्गिस मोहम्मदी यांची प्रकृती गंभीर
शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. नर्गिस वायव्य इराणमधील झान्जन येथील तुरुंगवासात आहेत. शुक्रवारी त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे त्यांच्या संस्थेकडून सांगण्यात आले.
