US-Iran Talks in Pakistan: इराणशी दुसऱ्या फेरीची चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी पाकिस्तानमध्ये दाखल होत आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरून दिली. करार दृष्टिपथात असला, तरी अमेरिकेची नाकेबंदी उठेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय इराणने घेतल्यामुळे वातावरण पुन्हा तापले आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे पाकिस्तानमध्ये वाटाघाटीसाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा इराणने कोणताही निर्णय घेतलेला नाही असे तेथील तस्निम वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
चर्चेच्या पहिल्या फेरीचे नेतृत्व करणारे उपाध्यक्ष जे.डी व्हान्स यांच्यासह अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अध्यक्षांचे सल्लागार जेरेड कुशनर हे सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होतील . सध्याची दोन आठवड्यांची शस्त्रसंधी २२ एप्रिल रोजी संपणार असताना ही चर्चा होत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर गोळीबार केल्याने युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच, अमेरिकेला हवा असलेला करार इराणने केला नाही, तर नागरी पायाभूत सुविधा नष्ट करण्याची धमकी त्यांनी दिली. ‘इराणने करार केला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक ऊर्जा प्रकल्प, पूल नष्ट करील,’ असे ते म्हणाले.
‘होर्मुझ’वरून तणावात वाढ
अमेरिका-इराण यांच्यातील करार दृष्टिपथात असला, तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेची नौदल नाकेबंदी सुरू असेपर्यंत इराणनेही होर्मुझ सामुद्रधुनी पूर्ण बंद केली आहे. इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहंमद कालिबाफ म्हणाले, ‘इराणला दीर्घ काळ टिकणारी अशी शांतता हवी आहे. अमेरिकेवरचा अविश्वास ही सध्या आमची मूळ समस्या आहे. मात्र, त्याच वेळी दीर्घ काळ टिकणाऱ्या शांततेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणचा अणुकार्यक्रम हे मतभेदाचे मुद्दे कायम आहेत. आम्ही सामुद्रधुनीतून कुठे जाऊ शकत नसू, तर इतर देशांनाही येथून जाणे कठीण आहे. अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही, तर होर्मुझमधील निर्बंध निश्चितच अधिक कडक करण्यात येतील. अमेरिकेने सामुद्रधुनीतील सुरुंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा युद्धविराम जवळपास संपुष्टात आला होता. अमेरिकेच्या या कृतीकडे इराण युद्धविरामाचे उल्लंघन या दृष्टिकोनातून पाहतो.’
युद्धविरामापूर्वी लेबनॉनमध्ये १५० ठार
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्यापूर्वी हेजबोला गटाबरोबर झालेल्या संघर्षात १५० जण ठार झाले. लेबनॉनच्या दक्षिण भागात इस्रायलने हल्ले केले. मृतांमध्ये अली रिदा अब्बास या म्होरक्याचा समावेश आहे. हेजबोलाने त्यांच्या कमांडरच्या मृत्यूच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
