अमेरिका-इस्रायल-इराण युद्धसमाप्तीसाठी चर्चा होणार की नाही, याबद्दल अमेरिका आणि इराणकडून अनेक उलटसुलट विधाने करण्यात आल्यानंतर अखेर इराण चर्चेला राजी झाल्याचे संकेत अनेक इराणी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरूनही अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, आता ते अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर पाकिस्तानात दाखल होत आहेत, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, व्हान्स मंगळवारी पाकिस्तानला रवाना होतील, असे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, व्हान्स चर्चेत सहभागी होणार असतील तरच इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ हेदेखील चर्चेत सहभागी होतील असे इराणच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानात झालेल्या पहिल्या फेरीच्या चर्चेत व्हान्स आणि कालिबाफ हे दोघेही सहभागी झाले होते. अमेरिका आणि इराणदरम्यानचा शस्त्रसंधी बुधवारी समाप्त होत आहे, त्यापूर्वी त्याला मुदतवाढ मिळण्यासाठी किंवा युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सहमती होणे आवश्यक आहे.
उलटसुलट चर्चा
अमेरिकेने इराणचे जहाज ताब्यात घेतल्यानंतर इराणने चर्चेस उपस्थित राहण्यास नकार दिला होता. तसेच अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी हटवावी या मागणीसाठीही इराम आग्रही होता. दोन्ही देशांनी ताठर भूमिका घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आक्रमक वक्तव्ये केली होती. “इराणचे नवे नेतृत्व हुशार असेल तर त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल,” असे ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर लिहिले. तर, “सततच्या युद्धामुळे कोणाचाही फायदा होत नाही, मात्र आगामी चर्चेवर ऐतिहासिक अविश्वासाचे सावट आहे,” असे विधान पेझेश्कियान यांनी केले.
