US Iran Tensions : अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव सध्या शिगेला पोहचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांच्या मदतीला जाण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता असतानाच इराणमधील एका नेत्याने आपल्या शेजारच्या देशांना धमकी दिली आहे.

अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घलिबाफ यांनी मंगळवारी इराण “या प्रदेशाला आग लावेल” असा इशारा दिला आहे. या प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसाठी हा एक अत्यंत गंभीर इशारा आहे.

‘मदत लवकरच पोहचेल’ असे आश्वासन देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना देशातील इंस्टिट्युशन ताब्यात घ्या असे आवाहन केले होते. त्याला २४ तासांहून अधिक काळ उलटून गेला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे आवाहन केले होते. त्यांच्या या पोस्टनंतर अमेरिका लवकरच इराणमध्ये लष्करी हस्तक्षेप करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र इराणमधील आंदोलन क्रूरपणे चिरडून टाकणे सुरूच असूनही अमेरिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

ट्रम्प इराणवर हल्ला करणार?

एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल आणि अरब अधिकार्‍यांनी ट्रम्प प्रशासनाला सांगितले आहे की, त्यांच्या मते इराणमधील राजवट अद्याप इतकी कमकुवत झालेली नाही की, अमेरिकेचे लष्करी हल्ले ती उलथवून टाकण्यासाठी निर्णायक धक्का ठरतील. एनबीसी न्यूजशी बोलताना अज्ञात सूत्रांनी सांगितले की, इस्रायली आणि अरब अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या तरी मोठ्या प्रमाणात हल्ले करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकी काहींनी तर इराणमधील राजवट आणखी कमकुवत होईपर्यंत थांबण्यास सांगितले आहे.

व्हाईट हाऊस मधील अधिकार्‍याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे अनेक पर्याय आहेत, ज्यापैकी लष्करी हस्तक्षेपाचा पर्याय देखील आहे. “इराणमधील परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावर राष्ट्राध्यक्ष वेगवेगळी मते ऐकून घेतात, पण अखेरीस स्वत:ला सर्वोत्तम वाटेल तोच निर्णय घेतात,” असे अधिकार्‍याने एनबीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

रॉयटर्सने बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका त्यांच्या या भागातील प्रमुख तळांवरून कर्मचाऱ्यांना परत बोलावत आहे. काही कर्मचाऱ्यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत कतारमधील अमेरिकन लष्कराचा अल उदैद एअर बेस (al udeid air base) सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली. जून महिन्यात इराणवर हल्ला करण्यापूर्वीही अमेरिकेने असेच केले होते.

इराणने सौदी अरेबिया, युएई आणि तुर्कियेसह आपल्या शेजारील देशांना दिलेल्या इशाऱ्यानंतर या हालचाली केल्या जात आहेत. जर अमेरिकेने हल्ला केला, तर त्यांच्या भूमीवर असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना आम्ही लक्ष्य करू, असा इशारा इराणने या देशांना दिला आहे.