US-Iran Tensions : अमेरिका आणि इराणमध्ये काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेकदा इराणमध्ये सत्तापालट करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तसेच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना जशास-तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे. असं असताना ट्रम्प यांनी नुकतंच पुन्हा एकदा मोठं भाष्य करत इराणमध्ये सत्ताबदल हा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय असेल असं म्हटलं.
दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प आणि अयातुल्ला अली खामेनी हे लवकरच भेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या संदर्भातील संकेत दिले आहेत. मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे म्हटलं की, ‘अमेरिका अजूनही इराणबरोबरचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवू इच्छिते. जर संधी मिळाली तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना भेटण्यास तयार आहेत’, असं भाष्य मार्को रुबियो यांनी केलं आहे.
मंत्री मार्को रुबियो काय म्हणाले?
ब्लूमबर्गशी बोलताना मार्को रुबियो यांनी म्हटलं की, “डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक वाद सोडवण्यासाठी थेट संपर्क हा एक व्यावहारिक मार्ग योग्य मानतात. मी अशा राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली काम करतो, जे कोणाशीही भेटण्यास तयार असतात. मला हे सांगताना पूर्ण विश्वास आहे की, जर अयातुल्ला अली खामेनी उद्या म्हणाले की त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायचं आहे, तर डोनाल्ड ट्रम्प त्यांना देखील भेटतील.”
दरम्यान, अमेरिकेने जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका यूएसएस गेराल्ड आर.फोर्ड मध्य पूर्वेत पाठवली आहे. एवढंच नाही तर मध्य पूर्वेत अमेरिका आपली लष्करी ताकद वाढवताना दिसत आहे. अशा घडामोडी घडत असताना मंत्री मार्को रुबियो यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. या वाढत्या शक्तीप्रदर्शनाच्या अनुषंगाने बोलताना रुबियो यांनी म्हटलं की, ‘डोनाल्ड ट्रम्प हे इराणशी वाटाघाटीद्वारे करार करण्यास वचनबद्ध आहेत. त्यामुळे लवकरच चर्चा होऊ शकते.’
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला?
‘गेल्या ४७ वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहेत आणि यादरम्यान अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र, आता जर इराणची राजवट बदलली तर तेच सर्वोत्तम असेल. इराणमध्ये सत्ताबदल हा आतापर्यंतचा सर्वोत्तम निर्णय असेल’, असं मोठं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे इराणमध्ये एकच खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “ते (अयातुल्ला अली खामेनी) ४७ वर्षांपासून फक्त बोलत आहेत. पण या काळात आपण अनेक जीव गमावले आहेत. पण जर आता इराण आणि अमेरिकेत नवीन करार झाला नाही तर अमेरिकेला तयार लष्करी शक्तीची आवश्यकता असेल.”

