Middle East Crisis : गेल्या ६ महिन्यांपासून अमेरिका-इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चालला असल्याचं दिसून येत आहे. अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणावाची परिस्थिती असल्यामुळे जागतिक व्यापाराला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष कधी संपेल? याबाबत अवघ्या जगभरातून प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या या युद्धाला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. तरी देखील या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा काढण्यात यश आलेलं नाही. या युद्धाबाबत आता अमेरिकेच्या माजी संरक्षण मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य करत इराण-अमेरिका युद्ध आणखी ६ महिने चालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे अवघ्या जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री लिओन पनेटा यांनी इशारा दिला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आणखी सहा महिने चालू शकते. हा संघर्ष एका पेचप्रसंगात अडकला आहे, त्यामधून मार्ग काढण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दोन्हीपैकी कोणत्याही बाजूला दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पनेटा यांनी हे भाष्य केलं आहे.
लिओन पनेटा यांनी काय म्हटलं?
“अमेरिका आणि इराण एका मोठ्या पेचप्रसंगात अडकले आहेत. हे काही गुपित नाही. मात्र, या युद्धातून बाहेर पडण्यासाठी किंवा ते संपवण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इराक आणि अफगाणिस्तान प्रमाणेच हे युद्धही पश्चिम आशियातील आणखी एक अयशस्वी युद्ध ठरू शकतं. मला वाटतं की, हे युद्ध कोणत्याही तोडग्याशिवाय आणखी ६ महिने चालण्याची शक्यता आहे”, असं लिओन पनेटा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पनेटा यांनी पेंटागॉनमधील अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाबाबतच्या अस्थिरतेच्या भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या लष्करी नेतृत्वातील तणावामुळे वॉशिंग्टनच्या शत्रूंना अमेरिकेची कमकुवत बाजू दिसून येऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. पॅनेटा म्हणाले की, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास अखेरीस पश्चिम आशियात अशा प्रकारचा दीर्घकालीन संघर्ष उद्भवू शकतो, जो टाळण्याचा प्रयत्न अमेरिकन नेत्यांनी आतापर्यंत केला आहे.
तेलाच्या ३ इराणी टँकर्सवर अमेरिकेचा भीषण हल्ला
अमेरिका-इराण युद्ध पुन्हा एकदा भडकलं आहे. इराणने अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेने ३ इराणी तेलवाहू टँकर्सवर भीषण हल्ला केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) प्रादेशिक सागरी हद्दीत गस्त घालत असलेल्या अमेरिकी नौदलाच्या दोन युद्धनौकांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आता अमेरिकी सैन्याने शनिवारी तीन इराणी तेलवाहू टँकर्सवर हल्ला केला आहे.
