US Iran War Cost: अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालेल्या युद्धाला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इराणला काही दिवसांत गुडघ्यावर आणण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेला हे युद्ध चांगलेच भारी पडत असल्याचे चित्र आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. तर, अमेरिकेत युद्धाच्या खर्चावरून वाद सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

१.५ ट्रिलियन डॉलर्सचा लष्करी अर्थसंकल्प

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी मंगळवारी काँग्रेसमधील डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन खासदारांना उत्तर दिले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२७ साठीच्या १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या लष्करी अर्थसंकल्पाच्या मागणीचे हेगसेथ यांनी समर्थन केले. दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष झाल्यानंतर सध्या इराणविरोधात शस्त्रसंधी लागू करण्यात आल्याची माहिती हेगसेथ यांनी खासदारांना दिली. दरम्यान, हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या सुनावणीत इराणविरुद्ध युद्धात किती रुपये खर्च करण्यात आले याची माहिती देण्यात आली होती.

युद्धावर २५ अब्ज डॉलर्स खर्च?

हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीची २९ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी अमेरिकेने इराणविरोधातील युद्धावर २५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याची माहिती देण्यात आली. हा खर्च प्रामुख्याने दारुगोळा आणि उपकरणांच्या देखभालीसाठी वापरण्यात आला होता, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. परंतु या युद्धाचा खर्च सुमारे २९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असल्याची माहिती पेंटागॉनचे सर्वोच्च अर्थसंकल्पीय अधिकारी ज्युल्स हर्स्ट यांनी काँग्रेसला दिली होती. ४ अब्ज डॉलर्सनी वाढलेला खर्च उपकरणांची दुरुस्ती, पार्ट बदली करणे यासह विविध गोष्टींवर खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक खर्च झाल्याचा दावा

“इराण युद्धावरील खर्चाबाबत ट्रम्प प्रशासनाने दिलेली माहिती चुकीची असू शकते, तसेच खर्चाचा आकडा जास्त असू शकतो”, अशी शंका डेमोक्रॅटिक नेते आणि विश्लेषकांनी उपस्थित केली आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलमधील प्राध्यापिका लिंडा बिल्मेस यांनी मांडलेल्या मतानुसार, “अमेरिकेकडून इराण युद्धावर दररोज सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतका होत आहे, महत्वाची बाब म्हणजे ही केवळ सुरुवात आहे.”

खर्च वाढण्याची भीती

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, इराणमधील युद्धामुळे अमेरिकेला ६३० अब्ज ते १ ट्रिलियन डॉलर्सचा खर्च येऊ शकतो असे काही डेमोक्रॅट नेत्यांनी म्हटले आहे. पण, हेगसेथ यांनी यावर बोलताना काँग्रेसमधील डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन यांची बेजबाबदार वक्तव्य त्यांचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे मत मांडले. दुसरीकडे अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान ३,३७५ लोक ठार झाले आहेत, अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.