Donald Trump Iran War Escalation Trap Warning by White House Expert: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आधीच ‘एस्केलेशन ट्रॅप’ मध्ये अडकले आहेत आणि इराणमध्ये अमेरिकन सैन्य उतरवल्यास ते यामध्ये अजूनच अडकतील असा इशारा शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक रॉबर्ट पेप यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिला आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा विषयाचे तज्ज्ञ आणि व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार असलेल्या पेप यांच्या मते, असे घडले तरच युद्ध खऱ्या अर्थाने लांबू शकते.

“तो सापळा अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाही, पण तो त्यांच्या (ट्रम्प) भोवती घट्ट होत चालला आहे, आणि त्यामुळेच तुम्हाला ते भूमिका बदलताना, काही काळ थांबून विचार करताना दिसत आहेत. प्रत्यक्षात, ते १० दिवस मरीन्स (सैन्य) तेथे पोहोचण्याची वाट पाहात आहेत,” असे पेप म्हणाले. पाच दिवसांसाठी हल्ल्याची तीव्रता कमी करण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेमधून त्यांच्या भूमिकेतील धरसोडवृत्ती दिसून आली होती. पेप यांनी सूचवले की, हे फक्त एक वेळकाढूपणाचे तंत्र आहे.

ट्र्प यांनी अमेरिकेच्या मरीन्सना घेऊन जाणाऱ्या जहाजांना माघारी फिरण्याचे अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत, हे पेप यांनी निदर्शनास आणून दिले. “मला कृती पाहायची आहे, यापैकी कोणत्याही नेत्याचे फक्त विधाने नाहीत,” असे पेप म्हणाले. जर ही जहाजे समुद्रातून माघारी फिरली तरच आपण तिसऱ्या टप्प्यातून माघार घेण्याबाबत चर्चा करू शकतो असेही ते म्हणाले.

एकदा का ते (अमेरिकन मरीन्स) तेथे पोहोचले, की आपण एका वेगळ्याच स्थितीत पोहचू. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अद्यापही इराणचे नियंत्रण आहे… त्यामुळे तेलाच्या किमती अजून वधारतील. जेपी मॉर्गनकडून मंदी हा शब्द वारंवार उच्चारला जाईल, असे आगामी काळातील घडामोडींच्या परिणामांचे विश्लेषण करताना पेप म्हणाले.

एस्केलेशन ट्रॅप काय आहे?

एस्केलेशन ट्रॅप नेमका काय आहे याबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “हा एस्केलेशन ट्रॅप (सापळा) तेव्हा तयार होतो. जेव्हा युद्धभूमीवरील यशाबाबत असलेला विश्वास, लक्ष्यांवर अचूक बॉम्बफेक करणे, बॉम्बने नेत्यांना ठार करणे, यातून अपेक्षित धोरणात्मक परिणाम साध्य होत नाही, ट्रम्प यांच्या बाजूने सत्तापालट, इराणमधील समृद्ध युरेनियमचा साठा हटवला जाणे हे होत नाही. आणि यामुळे अमेरिकेकडून अधिक शक्ती लावली जाते आणि संघर्ष पुढच्या टप्प्यावर पोहोचतो. त्यामुळे धोरणात्मक पातळीवर अधिक अपयश येते, आणि पुन्हा अमेरिका आपली शक्ती दुपटीने वाढवते, हे वाढतच जाते.” पेप यांच्या मते सध्याची परिस्थिती ही पूर्णपणे इराणला पूरक अशी आहे.

३,००० अमेरिकी सैनिक युद्धभूमीवर उतरणार?

अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी एकीकडे शांतता चर्चेची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे अमेरिका मध्यपूर्वेत ३००० सैनिक पाठविण्याची तयारी करत आहे. अमेरिका एलिट ८२ एअरबोर्न विभागातील जवानांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाठविण्याची तयारीत आहे. बुधवारी पहाटे माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील युद्ध जिंकल्याच दावा केला. तसेच, इराणचे हवाई दल, नौदल, लष्कर उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले. तसेच, इराणने मोठी भेट देखील दिल्याचा दावा त्यांनी केला.

इराणकडून युद्ध समाप्तीसाठी सात अटी

अमेरिकेने शस्त्रसंधीसाठी इराणसमोर १५ मुद्दे ठेवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता इराणने देखील संघर्ष थांबविण्यासाठी सात अटी मांडल्याची माहिती समोर आली आहे. आखातील देशातील अमेरिकेने सर्व तळ बंद करावेत, इराणवर भविष्यात हल्ले होणार नाहीत याची ग्वाही द्यावी, हिजबुल्लाहवरील इस्रायलचे हल्ले थांबवावेत, त्यांच्यावरील निर्बंध हटवावेत, युद्धातील नुकसानीची भरपाई द्यावी, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालू नयेत आणि होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून कर आकारण्यास मुभा द्यावी, अशा सात अटी इराणने ठेवल्याची माहिती समोर आली आहे.