वृत्तसंस्था, कैरो / दुबई / वॉशिंग्टन

इराणने अण्वस्त्रे तयार करू नयेत, यावरून इराणविरोधात अमेरिकेने पुकारलेले युद्ध आता ‘होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण नेमके कुणाचे, या प्रश्नावर येऊन ठेपले आहे. ‘होर्मुझ’वरील नियंत्रणावरून अमेरिका आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून, दोन्ही बाजूंनी मंगळवारीही परस्परांवर हल्ले केले. या संघर्षामुळे तेलाचे दर भडकले असून, ब्रेंट क्रूडच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ होऊन तेलाचे दर प्रतिपिंप ८७.४९ डॉलर इतके झाले.

इराणने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिका-इराणने परस्परांवर हल्ले सुरू केले. बुशहर आणि चोघादक येथे मोठ्या प्रमाणावर स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त इराणमधील माध्यमांनी दिले. अमेरिकेने इराणमधील लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. या संघर्षामुळे तेलाच्या किमतींनी चार आठवड्यातील उच्चांक गाठला. अमेरिकेने सलग तिसर्‍या रात्री इराणवर हल्ले केले. अमेरिकेने इराणची किनारी संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागण्याची ठिकाणे लक्ष्य केली. अमेरिकेच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याचे इराणने सांगितले.

इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या हवाई तळांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. चार क्षेपणास्त्रे पाडण्यात आल्याचे जॉर्डनच्या संरक्षण दलांनी सांगितले. अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे केंद्र असलेल्या बहारिनवरही इराणने हल्ले केले. तेथे धोक्याचे भोंगे वाजले. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले.

होर्मुझवर शुल्काच्या धमकीवरून ट्रम्प यांचे घुमजाव

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर २० टक्के शुल्क आकारण्याची योजना आहे, असे जाहीर करून २४ तास व्हायच्या आतच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. ‘‘पश्चिम आशियातील देशांशी चर्चा केल्यानंतर मी असे ठरवले आहे की, आखाती देश अमेरिकेत करणार असलेल्या व्यापार आणि गुंतवणूक करारांवर अमेरिका २० टक्के परतावा शुल्क आकारेल,’’ असे ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर लिहिले आहे.