US-Iran war impact on Indian workers : इराणने अमेरिका आणि इस्रायलविरोधात आखाती देशांना लक्ष्य केल्याने अनेक भारतीय तिथेच अडकले आहेत. याचा थेट परिणामी भारतीयांच्या खासगी कार्यक्रमांवर होत आहेत. आखाती देशांत अडकलेल्या अनेक भारतीय तरुणांचा विवाह येत्या काही दिवसांत आहेत. पण रद्दे होणारी विमान उड्डाणे आणि गगनाला भिडलेल्या विमान तिकिटांमुळे या तरुणांचा भारतात परतीचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे नियोजित तारखेला विवाह होईल की याचीच खात्री त्याच्या कुटुंबियांना देता येत नाहीय. हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
बिहारमधील मिन्हाज खानच्या लग्नासाठी भरजरी फेटा आणून ठेवलाय. पाहुण्यांना पत्रिका वाटून झाल्यात. बस, हॉटेल्स, कॅटरर्स सर्वकाही बुक करण्यात आलंय. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण मिन्हाज वेळेत लग्नाला पोहोचेल की नाही ही शंका आहे. लग्नाला आता अवघा आठवडा उरलेला असताना त्याच्या घरातले त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले. मिन्हाजचा कुवेतमधून प्रवास शेवटच्या क्षणी रद्द झालाय. त्याचे वडील रफी खान म्हणाले, “मी मुलीकडच्यांची आणि गावकऱ्यांची माफी मागितली आहे. आखाती देशांतील परिस्थिती सुधारल्यानंतर लग्नाची दुसरी तारीख निश्चित करण्याची विनंती त्यांना केली आहे.”
युद्धामुळे विवाह सोहळे संकटात
बिहारमधील गया जिल्ह्यातील शेरघाटी ब्लॉकमधील खंडैल गावात अशा डझनभर कुटुंबांनी लग्नाच्या तारखा निश्चित केल्या आहेत, पण त्यांचे नवरदेव परदेशात अडकले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हे याचे मुख्य कारण आहे. आखाती देशांतील परिस्थिती बिघडली असून विमाने रद्द होत आहेत आणि विमानभाडे गगनाला भिडले आहे.
आखाती देशांतून येणाऱ्या पैशांमुळे खंडैल गावाचा कायापालट झाला आहे. तिथे बँक, एटीएम, आरोग्य केंद्र आणि पक्की घरे आहेत. मात्र, आता हीच कमाई चिंतेचे कारण बनली आहे. खंडैल आणि आसपासच्या इमलीथान, जयपूर, रतनपूर आणि पंडौल गावांतील ४०० हून अधिक तरुण आखाती देशांत काम करतात. ईद आणि बकरीइदच्या काळात घरी येण्याची त्यांची परंपरा आहे, पण यावेळी युद्धामुळे सर्व काही विस्कळीत झाले आहे.
जलील शाह यांच्या कुटुंबाची अवस्थाही अशीच आहे. त्यांच्या मुलाचे लग्न ३० मार्च रोजी जहानाबादच्या एरकी गावात होणार आहे. मुलाने २६ मार्चचे तिकीट बुक केले होते, पण त्याचे विमान दोनदा रद्द झाले आहे. शाह म्हणाले, “आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. मुलगा आला तर वरात निघेल, आम्हाला अजूनही आशा आहे.” गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्यांनी पारंपरिक चुलीवर जेवण बनवण्याची तयारीही केली आहे.
ऑनलाईन विवाह करणार
गावचे मुखिया पती जावेद खान यांनी सांगितले की, अनेक कुटुंबे आता ‘प्लॅन बी’वर काम करत आहेत. जर नवरदेव वेळेवर पोहोचू शकला नाही, तर ‘ऑनलाईन निकाह’ लावला जाऊ शकतो. ते म्हणाले, “माझ्या स्वतःच्या कुटुंबात दोन लग्ने आहेत. एक नवरदेव बहरीनमध्ये तर दुसरा कतारमध्ये अडकला आहे.”
सौदी अरेबियापेक्षा कुवेत आणि कतारमधील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे नागरिक सांगत आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या छायेखाली लोक रात्रभर जागून बंकरमध्ये किंवा रस्त्यावर आश्रय घेत आहेत. नुकताच ६० हजार रुपयांचे तिकीट काढून परतलेले नासिर खान यांनी ही माहिती दिली.
प्रवासावर युद्धाचा परिणाम
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर हा संघर्ष सुरू झाला. इराणनेही क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांनी आपली हवाई हद्द बंद केली असून हजारो उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे आखाती देशांत काम करणारे भारतीय मजूर तिथेच अडकून पडले असून, त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यांवर आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.
