US Iran War: “इराणविरुद्धचे युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापर्यंत म्हणजेच जानेवारी २०२९ पर्यंत लांबण्याची शक्यता आहे”, अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातून समोर आली आहे. “इराण अमेरिकेचा दबाव सहन करत राहील आणि हे युद्ध पुढील राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीनंतरही लांबेल”, अशी भीती उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका

विशेष म्हणजे नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकीनंतर इराणविरुद्धचे युद्ध संपेल, असा दावा ट्रम्प यांनी बुधवारी केला होता. दरम्यान, ट्रम्प यांच्या या दाव्याच्या अगदी उलट हा अहवाल आहे. इराण आता अधिककाळ टिकणार नाही असे म्हणत निवडणुकांनंतर युद्ध लगेच संपेल, असे ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, इराण निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी अनावश्यक धडपड करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

अमेरिकेची योजना

इराणविरुद्ध युद्ध सुरु झाल्यापासून सात महिने झालेत. यात आतापर्यंत १८ अमेरिकन सैनिक शहीद झालेत. यावर लवकर तोडगा काढण्याबाबत ट्रम्प बोलत आहेत, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला माहिती देताना सांगितले. तसेच, ट्रम्प इराणवर आर्थिक बहिष्कार टाकण्याबाबतही बोलत असल्याचे अधिकारी म्हणाले. इराणची आर्थिक कोंडी करण्यासह इराणला आपला अणुकार्यक्रम बंद करण्यास भाग पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

युद्ध लांबण्याची शक्यता

इराणवर लादलेल्या आर्थिक दबावामुळे ते अणुकार्यक्रम बंद करतील, असा विश्वास ट्रम्प यांना वाटतो. “होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण आहे आणि इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आपली स्थिती आता खूप चांगली आहे. इराणचे लोक कधी उठून लढा देणार?”, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मध्यपूर्वेतील तैनात करण्यात आलेल्या अमेरिकी सैनिकांचा काळ २०२७ पर्यंत वाढवण्यात आल्याचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. सुरुवातीला हेगसेथ यांनी इराणविरुद्धची मोहीम एक लहान लष्करी कारवाई असल्याचे सांगितले होते, मात्र त्याची व्याप्ती आता खूप वाढली आहे.

सध्यस्थिती काय?

सध्या मध्यपूर्वेमध्ये अमेरिकेचे सुमारे ५०,००० सैनिक, १९ युद्धनौका, लढाऊ विमानांचे स्क्वॉड्रन, हवाई रक्षण युनिट्स आणि पॅराट्रूपर्स तैनात आहेत. युद्धग्रस्त भागात युद्धनौकांचे कर्मचारी, हवाई रक्षण युनिट्स आणि पॅराट्रूपर्सना अपेक्षेपेक्षा जास्त काळ थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती या प्रकरणाची माहिती असणाऱ्या सूत्रांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिली. सैन्याच्या एअर डिफेंडरचा कार्यकाळ ९ महिन्यांवरून १२ महिने करण्यात आला आहे. युरोप आणि पॅसिफिकमधून मध्यपूर्वेकडे जाण्याचे आदेश मिळालेले युनिट्स आता या भागात एका वर्षापेक्षा जास्त काळापासून तैनात आहेत.

इराणची भूमिका

इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे जनरल आणि इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांचे जवळचे सहकारी मोहम्मद रेझा नक्वी यांनी अमेरिकेच्या पीबीएस वृत्तवाहिन्याला दिलेल्या मुलाखतीत युद्धावर भाष्य केले होते. “हे युद्ध जितके लांबेल, तितका आपल्याला अनुभव मिळेल. अमेरिकेविरुद्ध कसे लढावे हे शिकण्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नव्हता. या पाच महिन्यांत आम्ही ते शिकलो,” असे नक्वी म्हणाले होते.