Middle East Crisis : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा केली होती, त्यानंतर या दोन्ही देशातील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्यामुळे जागतिक व्यापारालाही अडथळे निर्माण होत आहे. याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.
२८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आता अमेरिका-इराण युद्ध पुन्हा एकदा भडकलं आहे. इराणने अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांना लक्ष्य केल्यानंतर अमेरिकेने ३ इराणी तेलवाहू टँकर्सवर भीषण हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने काय म्हटलं?
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) प्रादेशिक सागरी हद्दीत गस्त घालत असलेल्या अमेरिकी नौदलाच्या दोन युद्धनौकांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर आता अमेरिकी सैन्याने शनिवारी तीन इराणी तेलवाहू टँकर्सवर हल्ला केला आहे.
इराणच्या हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर अमेरिकी सैन्याने इराणच्या खर्ग बेटाच्या किनाऱ्याजवळ दोन इराणी कच्च्या तेलाची टँकर्स नष्ट केली आहेत. ओमानच्या आखातात आणखी एक न भरलेला टँकरही निकामी करण्यात आला. यामध्ये अमेरिकेचे कोणतेही कर्मचारी जखमी झाले नाहीत, असं सेंट्रल कमांडने म्हटलं आहे.
दरम्यान, सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी म्हटलं की, “आयआरजीसी साठी हा संदेश आहे की, जर तुम्ही आमच्या दोन जहाजांवर हल्ला केला, तर आम्ही तुम्हाला त्याहून अधिक मोठी आर्थिक किंमत मोजायला लावू, म्हणजेच तुमची तीन जहाजे नष्ट करू. आम्ही अमेरिकी सैन्याच्या संरक्षणासाठी मागेपुढे पाहणार नाही. गरज पडल्यास इराणच्या मर्यादित व असुरक्षित तेलवाहू जहाजांच्या ताफ्याचा नायनाट करू”, असं त्यांनी म्हटलं आहे.
