अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ज्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण होर्मुझ बाबत महत्त्वाचा निर्णय घेऊन अमेरिकेने हा शांती करार केला आहे. दरम्यान या करारावर १९ जून रोजी स्वाक्षऱ्या होणार आहेत. तसंच या कराराच्या मसुद्याच्या १४ अटी समोर आल्या होत्या, त्याबाबत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट लिहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने सोशल मीडियाचं लक्ष वेधलं आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट?
शांतता करारात इराणने अण्वस्त्र तयार करणार नाही या अटीवर सहमती दर्शवली आहे. तसंच अमेरिकेने इराणला पुनर्वसनासाठी ३०० अब्ज डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी फिरते आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही. ही बातमी फक्त पेरली गेली आहे असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलंय. त्यामुळे शांतता करार हा इराणसाठी तोट्याचा सौदा ठरल्याची चिन्हं आहेत.
शुक्रवारी करारावर होणार स्वाक्षरी
समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणमधील महत्वपूर्ण कराराचा औपचारिक स्वाक्षरी सोहळा येत्या शुक्रवारी पार पडणार आहे. तर, पुढील ४८ तासांत या कराराचा सविस्तर तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा करार अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. करारात अजून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजूनही चर्चा होणे बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘रॉयटर्स’ला माहिती देताना सांगितले. पण, या करारामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यास मदत होईल, असे अमेरिकन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार
अमेरिका आणि इराण यांच्यातील करार होण्यासाठी पाकिस्तानने महत्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातून उभय देशांत झालेल्या करारावरील एकमताचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या कराराचे स्वागत केले. दरम्यान, दोन्ही देशांनी या प्राथमिक कराराला मान्यता दिली असली, तरी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत भविष्यात स्वतंत्रपणे चर्चा सुरू राहणार आहे. करारामुळे मिळणारा सर्वात मोठा दिलासा म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सागरी वाहतूक हळूहळू पूर्ववत होणार आहे. जागतिक व्यापार, इंधन आणि गॅस वाहतुकीसाठी याचा फायदा होणार आहे.
शांती कराराच्या मसुद्यातल्या १४ अटी कुठल्या होत्या?
१) इराणला कच्च तेल आणि पेट्रोकेमिकल्स संबंधीच्या ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या मुक्त करण्यात येतील.
२) इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिका त्यांचे निर्बंध मागे घेईल.
३) ६० दिवसांमध्ये इराणचे जे २४ अब्ज डॉलर गोठवण्यात आले होते त्यावरचे निर्बंध हटवण्यात येतील
४) इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र, इराणला ३०० अब्ज डॉलर्सच्या योजना सादर करेल.
५) लेबनॉनसह सर्व युद्ध तातडीने बंद केले जाईल.
६) अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.
७) अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती ३० दिवसाच्या आत पूर्णपणे हटवली जाईल.
८) अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.
९) होर्मुज खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत ३० दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.
१०) अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी ६० दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.
११) इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.
१२) अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.
१३)अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.
१४) इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.
इराणला ३०० अब्ज डॉलर्सच्या योजना अमेरिका आणि मित्र राष्ट्र देतील ही बाब म्हणजे पेरण्यात आलेली बातमी आहे अशी ठोस भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. तसंच ही बातमी खोटी आहे, आम्ही असं काहीही देणार नाही असंही ट्रम्प म्हणाले आहेत. ज्यानंतर इराणसाठी शांती करार हा तोट्याचा सौदा ठरला का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
मागील १०८ दिवसांमध्ये काय घडलं?
- २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला. सर्वोच नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू
- २ मार्च ला हिजुबल्लाहची युद्धात उडी
- ५ मार्चला अमेरिकेच्या आखातातील हवाई तळांवर इराणचे प्रतिहल्ले
- ८ एप्रिलच्या दिवशी म्हणजेच युद्धाच्या चाळीसाव्या दिवशी १४ दिवसांची शस्त्रसंधी जाहीर
- १२ एप्रिलला पाकिस्तानात इराण आणि अमेरिकेची पहिली शांतता चर्चा कुठल्याही तोडग्याविना निष्फळ ठरली
- २० एप्रिलच्या शांततेच्या चर्चेला इराण गैरहजर राहिल्याने दुसऱ्या चर्चेचा प्रयत्नही निष्फळ ठरला.
- १८ मे रोजी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातला तणाव वाढला
- ६ जून रोजी शस्त्रसंधी तुटली, अमेरिकेने इराणचे ६ ड्रोन केले निकामी
- ८ जूनला इराणने अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडलं, १०० दिवसांनी युद्ध पुन्हा भडकलं.
- ९ जूनला अमेरिकेने इराणवर केले बॉम्ब हल्ले
- १३ जूनला दोन्ही देशांमधला करार अंतिम टप्प्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
- १५ जून शांतता करार करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती
