रॉयटर्स, वॉशिंग्टन/ इस्लामाबाद
इराणबरोबरील युद्ध संपण्यासाठी लवकरच करार होईल, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मात्र, हा करार नेमका केव्हा होईल, यावर त्यांनी भाष्य केले नाही. दुसरीकडे ब्रिटन आणि फ्रान्सच्या पुढाकाराने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद होत असून, पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराणमधील चर्चेच्या दुसर्या फेरीची तयारी सुरू आहे.
इस्रायल-लेबनॉनमध्येही १० दिवसांचा युद्धविराम लागू झाला असून, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध संपण्यासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे.
ट्रम्प म्हणाले, ‘इराणबरोबर झालेला दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत वाढविता येऊ शकते. मात्र, त्याची फार गरज पडणार नाही. काय होते, ते आम्ही पाहू. इराणबरोबर करार करण्याच्या आम्ही अगदी समीप आहोत. हा करार जर झाला, तर पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये मी कदाचित जाईन.’ अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थ करीत असलेल्या पाकिस्तानमधील सूत्रांनी सांगितले, की पडद्यामागे खूप हालचाली घडत असून, अमेरिका आणि इराणमध्ये कराराची चौकट आणि कराराला तत्त्वत: मान्यता आगामी बैठकीत होऊ शकते आणि अंतिम करार ६० दिवसांत होऊ शकतो.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक वाढीचा दर कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हा संघर्ष दीर्घ काळ चालला, तर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेर्यात येऊ शकते, असा इशारा दिला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहावी आणि मुक्त वाहतुकीला धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सने पुढाकार घेतला असून, ४० देशांबरोबर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर तोडगा काढण्यासाठी ही परिषद घेतली जात आहे. पण, येथील संघर्ष संपल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाऊल उचलले जाईल, असे संकेत या देशांनी दिले आहेत. या संघर्षात थेट उतरण्याचे या देशांनी नाकारले आहे.
इस्रायल-लेबनॉनमध्येही युद्धविराम
इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धविरामही आता लागू झाला असून, अमेरिका-इराणमध्ये अंतिम करार होण्यासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. इराणबरोबर युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले होते. त्याला इराण आणि पाकिस्ताननेही विरोध केला होता. युद्धविरामामुळे बेरुतमध्ये जल्लोष करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा गुरुवारी केली.
