अमेरिका-इराणमधील युद्ध संपवण्यासाठी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हे युद्ध संपणार की पुन्हा भडकणार? याबाबत संभ्रमाचं वातावरण कायम आहे. दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असली तरी युद्ध पूर्णपणे संपलेलं नाही. ११ आणि १२ एप्रिल रोजी अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा झाली होती, पण २१ तास झालेली ही शांतता चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत अमेरिका- इराण आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही.
त्यानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीत तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, पण अद्यापही ठोस निर्णयापर्यंत दोन्ही देश पोहोचलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही देशातील तणावाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव असल्याने कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापाराला अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एक मोठं वक्तव्य करत अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्याच्या मार्गातील नेमकं अडथळा काय आहे? यावर भाष्य केलं आहे. अमेरिकेचा अप्रामाणिकपणा हाच हे युद्ध संपवण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असल्याचं मत अब्बास अराघची यांनी प्रेस टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर सद्भावनेचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. अराघची यांनी म्हटलं की, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेची कृती हा सर्वात मोठा अडथळा आहे. नॉर्वेच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या एका बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘उद्धट दृष्टिकोनावर’ आणि ‘धमकीवजा, चिथावणीखोर वक्तव्यावर’ टीका केली.
अब्बास अराघची यांनी म्हटलं की, “अमेरिकेकडे सद्भावनेचा अभाव आहे. तसेच अमेरिकेचा अप्रामाणिकपणा हाच या युद्धाच्या समाप्तीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.” तसंच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीला अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरलं आहे. अराघची म्हणाले की, “इराणविरुद्धची लष्करी कारवाई आणि इराणी बंदरांवरील सततच्या नाकेबंदीमुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीला लागून असलेला एक किनारी देश म्हणून इराण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या जलमार्गाशी संबंधित नवीन नियमांवर विचारविनिमय करत आहे.”

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं?
अमेरिका-इराणमधील युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार टीका केली. तसेच या संघर्षाला नैतिकता व आंतरराष्ट्रीय नियमांबाबतची ही एक लढाई असं त्यांनी म्हटलं आहे.
To every decent human being—regardless of religion, ethnicity, nationality, race, or any other distinction,
— Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) May 12, 2026
To Muslims, Jews, Christians, Sikhs, Hindus, Buddhists, and all others of faith,
And to those who follow no formal religion but hold deeply to the universal values of…
इस्माईल बाकाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “आमच्या शांतताप्रिय राष्ट्रावर जे संकट कोसळलं, हा आणखी एक संघर्ष आहे. एका बाजूला ते आहेत जे युद्धाचे प्रत्येक कायदे आणि मूलभूत मानवी सभ्यतेचं उल्लंघन करण्यात आनंद मानतात. जे फक्त मनोरंजनासाठी हत्या करतात, जे कुटुंबांना त्रास देण्यासाठी मुलांची कत्तल करतात, जे फक्त विध्वंसक शक्ती तपासण्यासाठी क्षेपणास्त्रे डागतात”, असं म्हणत बाकाई यांनी अमेरिकेवर टीका केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनला रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणचे सैन्य मोठ्या प्रमाणात कमकुवत झालं आहे. या संघर्षात अमेरिकेचाच विजय होईल. आपण हे युद्ध कसंही करून जिंकू. शांततेने किंवा इतर मार्गांनी पण आपण जिंकू. त्यांचं (इराणचं) नौदल आणि हवाई दल नष्ट झालं आहे, त्यांच्या युद्ध यंत्रणेचा प्रत्येक घटक गेला आहे”, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
इराण युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका!
अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालेल्या युद्धाला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इराणला काही दिवसांत गुडघ्यावर आणण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेला हे युद्ध चांगलंच भारी पडत असल्याचं चित्र आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, तर अमेरिकेत युद्धाच्या खर्चावरून वाद सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
१.५ ट्रिलियन डॉलर्सचा लष्करी अर्थसंकल्प
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी मंगळवारी काँग्रेसमधील डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन खासदारांना उत्तर दिलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०२७ साठीच्या १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या लष्करी अर्थसंकल्पाच्या मागणीचं हेगसेथ यांनी समर्थन केलं. दोन्ही देशांमध्ये थेट संघर्ष झाल्यानंतर सध्या इराणविरोधात शस्त्रसंधी लागू करण्यात आल्याची माहिती हेगसेथ यांनी खासदारांना दिली. दरम्यान, हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीच्या सुनावणीत इराणविरुद्ध युद्धात किती रुपये खर्च करण्यात आले याची माहिती देण्यात आली होती.
युद्धावर २५ अब्ज डॉलर्स खर्च?
हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीची २९ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी अमेरिकेने इराणविरोधातील युद्धावर २५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याची माहिती देण्यात आली. हा खर्च प्रामुख्याने दारुगोळा आणि उपकरणांच्या देखभालीसाठी वापरण्यात आला होता, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु या युद्धाचा खर्च सुमारे २९ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असल्याची माहिती पेंटागॉनचे सर्वोच्च अर्थसंकल्पीय अधिकारी ज्युल्स हर्स्ट यांनी काँग्रेसला दिली होती.
