अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणून जगभरात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार असलेली सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अरामकोने मंगळवारी एक गंभीर इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी वाहतूक अशीच विस्कळीत राहिल्यास, इराण युद्धाचे जागतिक तेल बाजारपेठेवर ‘विनाशकारी परिणाम’ होऊ शकतात, असे म्हटले आहे.

“जागतिक तेल बाजारपेठांवर विनाशकारी परिणाम होतील आणि जितका जास्त काळ हा अडथळा सुरू राहील, तेवढे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील,” असे अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासेर म्हणाले आहेत, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या अडथळ्याचा फटका शिपिंग आणि इन्शुरन्स क्षेत्राला आधीच बसला आहे आणि पुढे याचा परिणाम विमान वाहतूक, शेती आणि ऑटोमोबाईल उद्योगांवरही होऊ शकतो. नासेर यांनी नमूद केले की, जागतिक तेलाचा साठा आधीच पाच वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे आणि त्यांनी इशारा दिला की जर संघर्षामुळे सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पुन्हा सुरू झाली नाही, तर हा साठा वेगाने संपू शकतो.

अरामकोने तेलाच्या किंमती कमी झाल्याने त्यांच्या वार्षिक नफ्यात १२ टक्क्यांची घट झाल्याचे जाहीर केल्यानंतर आता ही प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांच्या पहिल्या शेअर बायबॅकमध्ये ३ अब्ज डॉलर्सपर्यंतचे शेअर्स पुन्हा खरेदी करण्याची त्यांची योजना आहे.

याआधी, सौदी अरेबियातील ‘Ras Tanura’ रिफायनरीवर इराणने ड्रोनने हल्ला केला होता. ही रिफायनरी अरामकोच्या मालकीची असून ही जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यात केंद्रांपैकी एक आहे. या रिफायनरीवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ देखील समोर आले होते. हल्ल्यानंतर रिफायनरी तात्पुरती बंद करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले होते.

नासेर यांनी याचीही पुष्टी केली की, गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यानंतर अरामकोची देशातील सर्वात मोठ रिफायनरी असलेल्या रास तनुरा रिफायनरीमध्ये छोटी आग लागली होती. ही आग थोड्याच वेळात नियंत्रणात आणण्यात आली आणि तसेच रिफायनरी पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मंगळवारी सकाळी इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअरने इशारा दिला की, जर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरूच राहिले, तर ते मध्य पूर्वेतून ‘एक लिटरही तेल’ बाहेर जाऊ देणार नाहीत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर इराणने या प्रदेशातून होणारी तेल निर्यात रोखली, तर अमेरिका इराणवर अधिक कठोर हल्ला करेल.