US strikes Iran after Donald Trump declared peace deal over : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार संपुष्टात आला असून अमेरिकेने इराणवर हल्ले करायला सुरुवात केली. आज मध्यरात्रीच आम्ही इराणवर हल्ले करू असा इशारा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा शब्द खरा ठरवला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली व्हावी यासाठी अमेरिेकेने इराणवर भीषण हल्ले केले.
अमेरिकेने म्हटलं आहे की, मंगळवारी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन मालवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेकडून हल्ला सुरू करण्यात आले आहे. यामुळे इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील अनेक शहरे हादरली आणि काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.
होर्मुझवरील हल्ल्यांना इराण जबाबदार
“यूएस सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) दलांनी इराणविरुद्ध अतिरिक्त हल्ले सुरू केले आहेत. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नौकानयनाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करण्याची त्यांची क्षमता अधिक कमकुवत होईल”, असं ‘सेंटकॉम’ने ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. “एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून मुक्तपणे प्रवास करणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर इराणने केलेल्या अन्यायकारक आक्रमणासाठी अमेरिका त्यांना जबाबदार धरत आहे”, असंही या निवेदनात जोडलं गेलं आहे.
दरम्यान, बहरीनच्या गृह मंत्रालयाने सांगितलं की, देशातील अनेक भागांमध्ये सायरन वाजवण्यात आले आहेत. त्यांनी नागरिक आणि रहिवाशांना शांत राहण्याचे आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. “सायरन वाजवला गेला आहे. नागरिकांनी आणि रहिवाशांनी शांत राहावं आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी जावे”, असं मंत्रालयाने ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. दुसरीकडे, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, देशाची हवाई संरक्षण यंत्रणा रॉकेट आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करत आहे.
“इराणने काल जहाजांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याचा हा बदला आहे. जर हे पुन्हा घडलं, तर परिस्थिती आणखी गंभीर होईल”, असं ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर लिहिलं.
२८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू केलं. याआधी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात जागतिक तेल वाहतूक होत होती. इराणवर हल्ले सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे जागतिक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, जहाजांवरील हल्ल्यांची जबाबदारी इराणने स्वीकारली नसली तरी, विश्लेषकांच्या मते तेहरान वाटाघाटींमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी अशा कारवायांचा वापर करत आहे.
