US Iran War escalates as Donald Trump confirms Tehran attack and military leadership casualties: पश्चिम आशियातील युद्ध आता एका भीषण वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर दावा केला आहे की, अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला असून, यामध्ये इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी नेते ठार झाले आहेत. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा एक मिनिट सात सेकंदांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये स्फोटांच्या ज्वालांनी तेहरानचे आकाश उजळून निघाल्याचे दिसत आहे.
४८ तासांचा अल्टिमेटम आणि ‘सर्वनाशा’चा इशारा
हा हल्ला ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर झाला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला होता की, जर इराणने वॉशिंग्टनसोबत करार केला नाही किंवा होर्मुझची सामुद्रधुनी (जागतिक तेल वाहतुकीचा मुख्य मार्ग) पुन्हा खुली केली नाही, तर इराणला ‘सर्वनाशा’चा सामना करावा लागेल.
अमेरिकेची मोठी हानी; दोन लढाऊ विमाने पाडली
गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात अमेरिकेला प्रथमच मोठ्या हानीचा सामना करावा लागला आहे. इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अमेरिकेचा एक क्रू सदस्य शत्रूच्या हद्दीत बेपत्ता असून, अमेरिकन लष्कराने त्याच्या शोधासाठी उच्च-जोखमीची मोहीम राबवली आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाच्या दाव्यांना मोठा धक्का बसला आहे.
लष्करप्रमुखांना हटवले
युद्धभूमीवरील या घडामोडींमुळे वॉशिंग्टनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ पदावरून पायउतार होऊन निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. या तडकाफडकी निर्णयाचे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही, मात्र युद्ध संचालनावरून ट्रम्प प्रशासनावर होणाऱ्या टीकेचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
इराणचा उपरोधिक पलटवार
दुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या कारवाईची सोशल मीडियावर थट्टा उडवली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने अमेरिकन लष्करी नेतृत्वातील बदलांचा संदर्भ देत, “सत्तापालट यशस्वी झाला” असे म्हणत ट्रम्प यांच्या ‘MAGA’ घोषणेची खिल्ली उडवली. तसेच, पाकिस्तानमधील इराणच्या दूतावासाने बेपत्ता अमेरिकन वैमानिकाबाबत भाष्य करताना म्हटले की, “तो सैनिक इराणच्या ताब्यात अधिक सुरक्षित आहे.”
