US Iran War Threats Escalate as Pete Hegseth Claim: पश्चिम आशियातील शांतता अबाधित राखण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीला ६० दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी करार करण्यात येणार आहे. मात्र या करारातील अटींवर इराण आणि अमेरिका यांची सहमती झालेली नाही. संभाव्य करारातील वाटघाटींमधून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले, गरज भासल्यास इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज आहे.
सिंगापूर येथील शांग्री-ला येथील परिषदेत बोलत असताना पीट हेगसेथ यांनी हे विधान केले. अमेरिकेकडे एकाचवेळी अनेक प्रदेशांमध्ये कारवाया करण्यासाठी आवश्यक असलेली लष्करी क्षमता आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे, असेही हेगसेथ म्हणाले.
“आवश्यकता भासल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याची आमची पुरेपूर तयारी आहे. आमच्याकडे उत्कृष्ट आणि मुबलक प्रमाणात दारुगोळ्याचा साठा आहे”, असा इशारा हेगसेथ यांनी दिला. पश्चिम आशियात तीन महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आणि त्यातून वाढत्या तणावानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात संभाव्य करारावर चर्चा सुरू असतानाच हेगसेथ यांचे हे आक्रमक विधान समोर आले आहे.
इराणला अण्वस्त्र मिळू नयेत, ही अमेरिकेची भूमिका आहे, याचा हेगसेथ यांनी पुनरुच्चार केला.
मध्यपूर्वेतील परिस्थितीबरोबरच हेगसेथ यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अमेरिकेच्या व्यापक धोरणांच्या उद्दिष्टांची रुपरेषाही मांडली. चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आशियामध्ये स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि सत्तेचा राखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे, असेही हेगसेथ यावेळी म्हणाले.
हेगसेथ यांच्यामते, या प्रदेशावर कोणत्याही एका देशाचे वर्चस्व निर्माण होऊ देऊ नये, हा अमेरिकन धोरणाचा भाग आहे. याचबरोबर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी भविष्यात सुरक्षेच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठा वाटा उचलावा, अशी अमेरिकेची अपेक्षा असल्याचे हेगसेथ म्हणाले. अमेरिकेने श्रीमंत राष्ट्रांना अनुदान देण्याचे युग आता संपले आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे मध्य पूर्व आणि आशियावर लक्ष
मध्य पूर्वेतील संघर्ष आणि आशियातील सामरिक स्पर्धा यांच्यावर अमेरिकन प्रशासनाचे दुहेरी लक्ष असल्याचेही हेगसेथ म्हणाले. इराणबरोबर कोणत्याही निष्कर्षाशिवाय चर्चा सुरू असली तरी गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्यास आम्ही सज्ज आहोत, असेही ते म्हणाले.
