इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकन जेटने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर भारत सरकार सतर्क झाले असून, खाडी क्षेत्रातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी देशाला ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली.
नेमकी घटना काय?
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन हवाई दलाने ‘पलाऊ’चा ध्वज असलेल्या ‘एमटी सेटबेलो’या व्यापारी जहाजावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात तीन भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृत खलाशांमध्ये विशाखापट्टणमचे मरीन इंजिनिअर पतनाला सुरेश (४४), उत्तर प्रदेशचे इंजिन फिटर शिवानंद चौरासिया (३८) आणि हिमाचल प्रदेशचे डेक कॅडेट आदित्य शर्मा (२३) यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
एकाच आठवड्यात तीन जहाजांवर हल्ले
चालू आठवड्यात भारतीय कर्मचारी असलेल्या एकूण तीन व्यापारी जहाजांवर अमेरिकन सैन्याकडून हल्ले झाले आहेत. मायव्हेक्स हे जहाज अमेरिकेच्या मते हे रिकामे तेल टँकर इराणच्या बंदराकडे जात होते. यावरील सर्व २४ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले. दुसरे एमटी सेटबेलो या जहाजावरील हल्ल्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला. तर तिसरे जलवीर ह्या युएईमधून भारताकडे मालवाहतूक करणाऱ्या या जहाजावरही हल्ला झाला, मात्र यातील सर्व २० भारतीय नागरिक सुरक्षित आहेत.
या कठीण काळात मोदी सरकार शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,” असे केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल म्हणाले होते. “या प्रदेशातील अलीकडील सुरक्षा घटनांनी व्यावसायिक जहाज वाहतुकीला भेडसावणारे मोठे धोके अधोरेखित केले आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे आणि कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे.” सांगण्यात आले आहे, असे सरकारने पुढे म्हटले आहे. असे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिध्द केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखातातील व्यापारी जहाजांवरील अमेरिकी लष्कराच्या कारवाईचे समर्थन आणि कौतुक केले आहे. “आम्ही रात्रीच्या वेळी शांतपणे मोठी जहाजे नष्ट करत आहोत. आम्ही इराणचे रडार आणि यंत्रणा बॉम्बने उद्ध्वस्त केली आहे,” असे ट्रम्प म्हणाले. यूएस सेंटकॉमच्या (US CENTCOM) माहितीनुसार, एप्रिलमध्ये नौदल नाकेबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत नियमांचे पालन न करणारी ९ जहाजे निष्क्रिय करण्यात आली असून, १३५ जहाजांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
भारत सरकारकडून सुरक्षेचे चोवीस तास मॉनिटरिंग
वाढता धोका पाहता, भारत सरकारने होर्मुझची सामुद्रधुनी आणि लगतच्या सागरी क्षेत्रातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मित्र देशांचे सागरी प्रशासन आणि जहाजबांधणी कंपन्यांशी सरकार सतत संपर्कात आहे. अशांत समुद्रातून प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय आणि परदेशी जहाजांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, खलाशांच्या चोवीस तास सुरक्षेसाठी विशेष संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
