Analyzing Donald Trump’s four strategic options as 10,000 additional US troops prepare for deployment: अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात युद्ध सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत. इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी हल्ला केल्याचे अमेरिका व इस्रायलने म्हटले होते. युद्धात विजय लवकरच होणार असून अमेरिकेला जे साध्य करायचे होते ते अमेरिकेने साधले आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका-इराणमध्ये चर्चा होत असल्याच्या चर्चांना इराणने फेटाळले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका इराणमध्ये १० हजार सैनिकांना पाठवण्याची तयारी करत आहे.
येत्या काही दिवसांत व्हाईट हाऊस व पेंटागॉन अतिरिक्त १० हजार सैनिक मध्य पूर्व मध्ये पाठवणार असल्याचे वृत्त ‘एन एक्झिओस’ने दिले होते. अमेरिका जेट स्क्वॉड्रन्स व हजारो सैनिकांना मध्य पूर्व मध्ये सुरू असलेल्या युद्धात सहभागी होण्यासाठी पाठवणार असल्याचे वृत्त अमेरिकेच्या संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने देखील दिले आहे. दरम्यान, याला अमेरिकेकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
अमेरिकेचे सैनिक इराणच्या जमिनीवर कधी पाय ठेवतात याची इराणी सैन्य वाट पाहत आहे. जेणेकरून त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडता येईल, अशी प्रतिक्रिया इराणच्या संसदेचे प्रवक्ते मोहम्मद बाघेर घालिबाफ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिकेने जमिनीवरून इराणचा ताबा घेण्याची तयारी केली आहे का? जर तयारी केली असेल तर त्याचा परिणाम काय होईल? ट्रम्प यांच्यासमोर कोणते चार पर्याय आहेत? हे जाणून घेऊया.
अमेरिकेकडे असलेले चार पर्याय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी चार पर्याय ठेवले असल्याचे वृत्त ‘एक्झिओस’ने दिले आहे. ट्रम्प त्या चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकतात.
१. खर्ग बेट ताब्यात घेणे
पर्शियन आखातात असलेले खर्ग बेट इराणसाठी अत्यंत महत्वाचे आहे. खर्ग बेटावरून इराण ९० टक्के तेल व नैसर्गिक वायूची निर्यात करतो. खर्ग बेट इराणपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकेने १३ मार्च रोजी खर्ग बेटावर क्षेपणास्त्र डागले होते. परंतु, बेटावरील इराणच्या तेल निर्यातीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांना अमेरिकेने लक्ष्य केले नव्हते. खर्ग बेटाचा ताबा घेतल्यास अमेरिकेला इराणची आर्थिक कोंडी करता येईल. परंतु, खर्ग बेटाचा ताबा घेणे अमेरिकी सैनिकांसाठी सोपे नसेल. अमेरिकी सैनिकांनी खर्ग बेटाचा ताबा घेतला, तर इराणची क्षेपणास्त्रे, ड्रोन, तोफा सहजपणे खर्ग बेटावरील पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे खर्ग बेट पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प खर्ग बेटाला ताब्यात घेण्याचा पर्याय नाकारू शकतात.
२) होर्मुझ सामुद्रधुनीतून पूर्वेकडे जाणाऱ्या जहाजांना रोखणे
खर्ग बेट ताब्यात घेण्याआधी अमेरिकेला होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेणे आवश्यक ठरते. होर्मुझ सामुद्रधुनीतून पूर्वेकडे तेल वाहतूक करणारी जहाजे जात आहेत. त्या जहाजांना अमेरिकेने रोखल्यास इराणचे आर्थिक स्त्रोत बंद होतील. परंतु, त्यासाठी अमेरिकेला इराणच्या समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या इराणी सैन्याचा सामना करणे आवश्यक ठरते. तसेच दक्षिण इराणमध्ये डोंगराळ भाग अधिक आहे. तिथे इराणने बोगदे तयार करून त्यात क्षेपणास्त्रे, दारूगोळा ठेवला असल्याचे सांगितले जाते. त्या बोगद्यांमधून होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी क्षेपणास्त्रे, दारूगोळा पुरवला जातो. त्यामुळे ते बोगदे व किनारपट्टीवरील इराणी सैन्याशी अमेरिकेला आधी दोन हात करावे लागतील. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना अमेरिकेने रोखल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे.
३) लरक बेट ताब्यात घेणे
‘एक्झिओस’ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यासमोर लरक बेट ताब्यात घेण्याचा पर्याय आहे. इराणकडे असलेले लरक बेट होर्मुझ सामुद्रधुनीत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. या बेटावरून होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवणे इराणला सहज शक्य होते. हे बेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या मध्यात आहे. या बेटावर इराणने जहाजांना उद्ध्वस्त करणारी लढाऊ विमाने तैनात ठेवली आहेत. रडार यंत्रणा, बंकर उभारल्या आहेत. लरक बेटावर इराणची मजबूत पकड आहे.
४) अबू मुसा व अन्य दोन छोटे बेट ताब्यात घेणे
पर्शियन आखातातील इराणच्या ताब्यातील अबू मुसा व त्याच्या जवळ असलेले अन्य दोन बेट ताब्यात घेण्याचा पर्याय ट्रम्प यांच्यासमोर आहे. अन्य दोन बेट म्हणजे ग्रेटर टंब आणि लेसर टंब हे आहेत. या दोन्ही बेटांवर १९७१ पासून इराणचे नियंत्रण आहे. परंतु, या बेटांवर यूएईदेखील दावा करतो. त्यामुळे इराण व यूएईमध्ये या बेटांवरून वाद आहेत.
इराणचे प्रवक्ते घालिबाफ यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली होती. आखातातील एक देश दुसऱ्या एका देशाच्या मदतीने इराणच्या ताब्यातील एक बेट बळकावण्याचा प्रयत्न करतोय. तसे झाल्यास आखातातील त्या देशावर अमर्याद हल्ले केले जातील. तसेच त्या देशातील महत्वाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील, असे घालिबाफ म्हणाले होते. दरम्यान, घालिबाफ यांनी यूएई या देशाला अबू मुसा या बेटाबाबत इशारा दिला, असे ‘एक्झिओस’ या वृत्त संस्थेने म्हटले होते.
