Middle East Crisis : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. दोन्ही देशातील वाढत्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम मिळाला होता. डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. मात्र, ही शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केली आणि त्यानंतर अमेरिका-इराणमधील संघर्षात पुन्हा वाढ झाली.

अमेरिका-इराणमधील संघर्षात सातत्याने वाढ होत असल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत असून याचे गंभीर परिणाम अनेक देशांवर होत आहेत. त्यामुळे अमेरिका-इराणमधील युद्धाची परिस्थिती निवळण्यासाठी सातत्याने दुसऱ्या देशांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका-इराणमधील युद्धावर तोडगा काढण्यास अद्याप यश आलेलं नाही. यातच आता अमेरिका-इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ मोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व घडामोडींच्या दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेले नाहीत. त्यामुळे अमेरिकेबरोबर युद्ध करायचं की शांतता चर्चा? किंवा दोन्ही देशातील शांतता करार, याबाबत इराणचा अंतिम निर्णय नेमकं कोण घेतं? याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यावर आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भाष्य करत मोठा खुलासा केला आहे.

इराणचा अंतिम निर्णय कोण घेतं?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिका-इराणमधील संघर्षाबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. इराणने अमेरिकेबरोबर युद्ध करावं की युद्धबंदी मान्य करावी? याबाबतचा अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या हातात असतो असं त्यांनी सांगितलं. मात्र, युद्ध किंवा युद्धविरामाच्या परिस्थितीचं विश्लेषण करण्याची जबाबदारी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची असते. पण अंतिम निर्णय सर्वोच्च नेतेच घेतात, अशी माहिती अब्बास अराघची यांनी ‘तेहरान टाइम्स’शी बोलताना सांगितली आहे.

अमेरिका-इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ मोडला?

अमेरिकेने सर्वप्रथम इस्लामाबाद सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काज़ेम गरीबाबादी यांनी केला आहे. त्यामुळे इराणनेही या करारांतर्गत असलेली आपली वचनबद्धता स्थगित करण्याची घोषणा केली असल्याची माहिती काज़ेम गरीबाबादी यांनी दिली आहे.

“अमेरिकेनं करारासंदर्भात त्यांचं वचनं पाळलं नाही. त्यामुळे आता तेहराननेही आपल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी थांबवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनं ‘इस्लामाबाद सामंजस्य करारा’च्या चौकटीतील सर्व वचनबद्धतेचं उल्लंघन करत त्या स्थगित केल्या आहेत. त्यामुळे आम्हीही आमच्या वचनबद्धता स्थगित केल्या आहेत. आता आम्ही देखील त्या कराराची अंमलबजावणी करत नसून देशाच्या संरक्षणाच्या कामात व्यस्त आहोत”, असं इराणचे उपपरराष्ट्रमंत्री मंत्री काज़ेम गरीबाबादी यांनी शनिवारी म्हटलं आहे.