Middle East Crisis : अमेरिका-इराण संघर्ष दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही देशातील संघर्षात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही होत असून याचा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्याने अनेक देशांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत.

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होण्यासाठी पाकिस्तानने देखील मध्यस्थी केली होती. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला त्यानंतर पूर्णविराम मिळाला होता. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. मात्र, आता अमेरिका-इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ मोडला असल्याची माहिती समोर येत आहे.

इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काज़ेम गरीबाबादी यांनी या संदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. अमेरिकेने सर्वप्रथम इस्लामाबाद सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप काज़ेम गरीबाबादी यांनी केला आहे. त्यामुळे इराणनेही या करारांतर्गत असलेली आपली वचनबद्धता स्थगित करण्याची घोषणा केली असल्याची माहिती काज़ेम गरीबाबादी यांनी दिली आहे. संदर्भातील वृत्त इराणमधील फार्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

“अमेरिकेनं करारासंदर्भात त्यांचं वचनं पाळलं नाही. त्यामुळे आता तेहराननेही आपल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी थांबवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनं ‘इस्लामाबाद सामंजस्य करारा’च्या चौकटीतील सर्व वचनबद्धतेचं उल्लंघन करत त्या स्थगित केल्या आहेत. त्यामुळे आम्हीही आमच्या वचनबद्धता स्थगित केल्या आहेत. आता आम्ही देखील त्या कराराची अंमलबजावणी करत नसून देशाच्या संरक्षणाच्या कामात व्यस्त आहोत”, असं इराणचे उपपरराष्ट्रमंत्री मंत्री काज़ेम गरीबाबादी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार आता प्रभावी राहिला नसल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता इराणनेही या कराराबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता या दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

काळ्या शवपेटीत ट्रम्प यांच्या फोटोसह झळकला बॅनर

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला एकत्र आलेल्या जमावाने डोनाल्ड ट्रम्प यांना ठार करा, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता इराणची राजधानी तेहरानमध्ये भलामोठा फलक उभारण्यात आला असून, त्यावर एका काळ्या शवपेटीत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो दिसत आहे आणि फलकावर “आम्ही ट्रम्प यांना ठार मारू”, असा संदेश लिहण्यात आला आहे.

तेहरानमध्ये मोठा फलक

तेहरान शहराच्या मध्यवर्ती भागात हा भलामोठा फलक उभारण्यात आला आहे. त्यावर एका मोठ्या काळ्या शवपेटीत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो दिसत आहे. तर, फलकावर खाली पर्शियन आणि इंग्रजी भाषेत विविध संदेश लिहण्यात आले आहेत. यात “आम्ही ट्रम्प यांना ठार मारू”, असा इंग्रजी संदेश देखील लिहण्यात आला आहे. शवपेटीत डोनाल्ड ट्रम्प यांचा काळ्या कोट, लाल रंगाची टाय, हाताची घडी, डोकं आणि पाय शवपेटीतून स्पष्ट दिसतील असे दाखवण्यात आले आहे.