USS Tripoli deployment Middle East: मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या प्रदेशात ३,५०० हून अधिक अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये २,५०० मरीन सैनिकांसह सज्ज असलेले ‘युएसएस त्रिपोली’ (USS Tripoli) हे आधुनिक जहाज आता युद्धक्षेत्रात दाखल झाले आहे.
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि ११,००० लक्ष्यांवर हल्ले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ११,००० हून अधिक लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पेंटागॉन आता इराणमध्ये आठवडाभर चालणाऱ्या संभाव्य भू-कारवाईचा आराखडा तयार करत आहे. तथापि, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भूदल तैनात करण्यास अंतिम मंजुरी देणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी: जागतिक व्यापाराची गळचेपी?
इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण घट्ट केले आहे. हा जलमार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याने सुएझ कालव्याकडे जाणारा ‘बाब अल-मंडेब’ हा सागरी मार्गही आता असुरक्षित झाला आहे.
राजकीय वाटाघाटी अपयशी
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले की, भूदल तैनात न करता आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याचे वॉशिंग्टनचे प्रयत्न आहेत. मात्र, इराणने अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इराणने स्वतःच्या सार्वभौमत्वाची मान्यता आणि नुकसानभरपाईची मागणी केली असून, अणुकार्यक्रमावरून मागे हटण्यास नकार दिला आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
होर्मुझ आणि सुएझ कालव्याच्या मार्गावर निर्माण झालेल्या या अडथळ्यामुळे भारताचा इंधन पुरवठा महागण्याची भीती आहे. तसेच, सागरी वाहतूक विस्कळीत झाल्याने खत आणि गॅसच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
