अमेरिका-इराणमधील युद्धाचा वणवा पुन्हा पेटणार की आता युद्धविराम कायम राहणार? याबाबतचा प्रश्न सध्या संपूर्ण जगाला सतावत आहे. अमेरिका-इराणमधील युद्ध तब्बल एक महिना सुरू होतं. मात्र, त्यानंतर अखेर ८ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. तसेच या युद्धावर कायमचा तोडगा काढण्यासाठी शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पण तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिका करारांप्रति वचनबद्ध नसल्याचा दावा इराणने केला आहे. तसेच इराणच्या लष्करी अधिकाऱ्यानेही एक मोठं वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
इराणच्या सशस्त्र दलांनी काय म्हटलं?
मोहम्मद जाफर असदी हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील एक इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि ब्रिगेडियर जनरल आहेत. त्यांनी म्हटलं की, ‘अमेरिका-इस्रायल युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण समोर आलेले पुरावे हेच दर्शवतात की अमेरिका कोणत्याही करारांप्रति किंवा संधींप्रति वचनबद्ध नाही’, असा दावा त्यांनी केला आहे.
मोहम्मद जाफर असदी यांनी इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात हे भाष्य केलं. असदी यांनी आरोप केला की, “अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या अलीकडील कृती आणि विधानांचा अभ्यास केला तर राजनैतिक सामंजस्याप्रती वचनबद्धतेचा अभाव दिसून येत आहे. कारण अमेरिकी अधिकाऱ्यांच्या कृती आणि विधानं प्रामुख्याने प्रसिद्धीसाठी प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा पहिला उद्देश तेलाच्या किंमती कमी होण्यापासून रोखणं आणि दुसरं म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या गोंधळातून स्वतःची सुटका करून घेणं हाच असल्याचं दिसत आहे.”
“पण इराणचं सशस्त्र दल सतर्क आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या वाढत्या तणावाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सशस्त्र दल सज्ज आहे. अमेरिकेकडून होणाऱ्या कोणत्याही नवीन साहसी कृत्यांसाठी किंवा मूर्खपणासाठी आमचं सशस्त्र दल पूर्णपणे तयार आहे”, असं मोहम्मद जाफर असदी यांनी म्हटलं आहे.
इराणचा अमेरिकेला आठवड्यात दुसरा प्रस्ताव
होर्मुझची नाकेबंदी खुली करण्याबाबत मांडलेला प्रस्ताव नाकारल्यानंतर इराणने आता अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. या आठवड्यातील हा दुसरा प्रस्ताव आहे. शांतता चर्चेत मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानकरवी इराणने हा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त आयआरएनए या इराणी वृत्त संस्थेने प्रसिद्ध केले. पण, आण्विक कार्यक्रमाबाबतच्या चर्चेला आग्रही असणारी अमेरिका या नव्या प्रस्तावाला काय उत्तर देणार याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
‘आयआरएनए’ या इराणी वृत्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, “इराणने नवा प्रस्ताव गुरुवारी रात्री मध्यस्थी पाकिस्तानकडे सोपवला आहे”. इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत अमेरिकेबरोबर वाटाघाटींमध्ये युद्ध समाप्ती आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करणे हेच तेहरानचे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने इराण विरोधातील संघर्षात ०७ एप्रिल रोजी दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली होती. ही मुदत समाप्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीवरुन हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आल्याची माहिती स्वत: ट्रम्प यांनी दिली आहे.
‘त्यांचे राजवाडे उद्ध्वस्त करू’, इराणच्या खासदाराचा इशारा
इराणच्या एका वरिष्ठ खासदाराने शेजारील आखाती देशांना गंभीर इशारा दिला. “जर इराणच्या नेत्यांवर किंवा सर्वोच्च नेतृत्वावर कोणताही हल्ला झाला, तर त्याला साथ देणाऱ्या आखाती देशांच्या राज्यकर्त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही आणि त्यांचे राजवाडे उद्ध्वस्त केले जातील,” असं प्रक्षोभक विधान इराणचे खासदार महमूद नबावियान यांनी केलं आहे.
Iranian MP and member of the negotiation delegation Mahmoud Nabavian states that if Iranian leaders are assassinated in any attack, all of the complicit despots in the Persian Gulf will be killed and their palaces destroyed. pic.twitter.com/JUioYttQtc
— Seyed Mohammad Marandi (@s_m_marandi) May 1, 2026
महमूद नबावियान हे इराणच्या अणुकराराच्या वाटाघाटी करणाऱ्या पथकाचे सदस्य आहेत. त्यांनी शुक्रवारी एका व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा दिला. नबावियान यांच्या मते, जर अमेरिकेने किंवा इस्रायलने इराणच्या नेत्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आखाती देशांनी (उदा. सौदी अरेबिया, युएई इ.) मदत केली, तर त्याचे परिणाम भीषण असतील. नबावियान यांनी स्पष्ट केलं की, इराण केवळ हल्ला करणाऱ्या देशावरच नाही, तर त्यांना साथ देणाऱ्या प्रादेशिक सत्ताधिशांवरही थेट हल्ला करेल. त्यांनी आखाती देशांना बजावलं आहे की, त्यांच्या भूमीवर असलेले अमेरिकन किंवा परदेशी लष्करी तळ इराणविरुद्ध वापरू दिले जाऊ नयेत. जर या तळांवरून इराणवर हल्ले झाले, तर त्या देशांना ‘गुन्हेगार’ मानले जाईल. त्यांनी अतिशय कठोर शब्दात सांगितलं की, या हल्ल्यात सहभागी होणारे कोणतेही राज्यकर्ते सुरक्षित राहणार नाहीत.
