Iran US War Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेचा मुहूर्त ठरत नाहीये. अशात इराणने मांडलेला प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. संघर्षावर तोडगा निघत नसताना इराणने मात्र त्यांचा आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. इराणी लष्कराने अमेरिकेविरुद्ध नव्या शस्त्राचा वापर करण्याची तयारी केली आहे. इराणी नौदल अधिकाऱ्याने याबाबत अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे.

अमेरिकेला इशारा

इराणी नौदल अधिकारी शाहरम इराणी यांनी नव्या शस्त्राबद्दल केलेल्या वक्तव्याने जगाचे टेन्शन वाढवलं आहे. “इराण लवकरच त्यांच्या शत्रूचा सामना करेल, यावेळी घातक शस्त्र अगदी त्यांच्या जवळच असेल. मला आशा आहे की यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊ नये”, असे वक्तव्य अधिकारी इराणा यांनी केले आहे. युद्धविराम जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध विजयचा दावा केला होता. पण, इराणने मात्र ट्रम्प यांना कल्पानांमध्ये रमू द्या म्हणत त्यांचे असे दावे आता एक विनोद होत चालले आहेत, अशी इराणकडून प्रतिक्रिया दिली जात आहे.

अमेरिकी – इस्रायली तळांवर हल्ले केल्याचा दावा

शत्रूला (अमेरिकेला) असे वाटतं की, “अगदी थोड्या वेळात तीन दिवस अथवा एका आठवड्यात इराणविरुद्धच्या युद्धावर तोडगा निघेल. पण, त्यांचा असा समज आता लष्करी समुदायांमध्ये एक विनोद ठरत चालला आहे”, असे शाहरम इराणी म्हणाले. इराणी सुरक्षा दलाने २८ फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इराणविरोधात अनेक प्रतिहल्ले केल्याचा दावा इराणी यांनी केला. अमेरिका आणि इस्रायलच्या १०० तळांवर इराणने हल्ला केल्याचा दावा इराणी यांनी केला. पश्चिम आशियातील अनेक संवेदनशील ठिकाणांना निशाणा केल्याचे इराणी म्हणाले.

शांतता चर्चा रखडली

अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळून धमकीची भाषा वापरल्यास यावेळी वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणी यांनी दिला. अमेरिकेने अनेक लष्करी क्षमतांचा वापर करुन देखील त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. आज देखील त्यांचे लष्कर ताटकळत उभं असल्याची टीका इराणी यांनी केली. इराणचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावल्यामुळे दोन्ही देशातील चर्चा रखडली आहे. दरम्यान, अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यास इराण सध्या तयार नसल्याने चर्चा रखडली असल्याची माहिती समोर आली आहे.