US Iran War Update: Donald Trump announces potential end to conflict while increasing military presence : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध लवकरच संपुष्टात येईल अशी घोषणा केले आहे, मात्र दुसरीकडे अमेरिका मध्यपूर्वेत आपल्या सैन्याची तैनाती वाढवत असल्याची बाब समोर आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणची अणु कार्यक्रम यावरून असलेला तणाव अद्याप कायम असल्याने,खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिका हजारोंच्या संख्येने अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे.
अमेरिका मध्यपूर्वेत सैन्य पाठवत असल्याची वेळ ही दोन्ही देशांमधील तणावात भर घालणारी आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा कालावधी संपत चालला आहे, यातच दोन्ही देशांमधील वाटाघाटीतून अद्याप काहीही ठोस तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांकडून आपली भूमिका अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जरी ट्रम्प युद्ध लवकरच संपेल असे सांगत असले, तरी दुसरीकडे अमेरिका हा संघर्ष अधिक काळ लांबू शकतो यासाठीची आवश्यक तयारी करताना दिसत आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध संपण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. “मला वाटते की हे (युद्ध) लवकर संपू शकते. त्याचा लवकरच शेवट होईल,” असे ते म्हणाले.
तसेच ट्रम्प यांनी पुढील दोन दिवसांत पाकिस्तानात इराणबरोबर चर्चा सुरू होऊ शकते, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सूचित केले आहे. ते म्हणाले, “तुम्ही लक्ष ठेवा. कारण पुढील दोन दिवसांत काहीतरी मोठे घडू शकते आणि आम्हाला खरोखर तिथे जाण्याची इच्छा आहे.” पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर उत्कृष्ट काम करत आहेत, त्यामुळे हे शक्य झाले असल्याची प्रशंसाही ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीसाठीही शुक्रवार ते रविवार या दरम्यानची वेळ निवडली जाऊ शकते.
१० हजार सैनिक पाठवणार
द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पेन्टागॉन मध्यपूर्वेमध्ये जवळपास १० हजार अतिरिक्त सैन्य पाठवत आहे. यापैकी सुमारे ६ हजार सैनिक यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या एस्कॉर्ट जहाजांवर तैनात आहेत. तर बॉक्सर अँफिबिअस रेडी ग्रुप आणि ११ व्या मरीन एक्सपिडिशनरी युनिटमधीलइतर ४ हजार २०० सैनिक या महिन्याच्या अखेरीस पोहोचणे अपेक्षित आहे.
आखाती देशांमधील मोहिमांसाठी आधीच तैनात असलेल्या सुमारे ५० हजार अमेरिकन सैनिकांमध्ये या अतिरिक्त सैन्याची भर पडणार आहे. विशेष बाब म्हणजे, आता तीन विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन , यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड आणि यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश मध्यपूर्वेतील समुद्रात आहेत. यामुळे अमेरिकेच्या मोहिमांची व्याप्ती आणि हल्ला करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
सैन्याची तैनाती वाढवण्याबरोबर अमेरिकेने त्यांच्या बंदरांची नाकेबंदी करून इराणवरील दबाव वाढवला आहे . ओमानच्या आखातात आणि अरबी समुद्रात युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. इराणमधून बाहेर पडलेली अनेक जहाजे परत पाठवण्यात आली आहेत.
