अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटला असून याचे जगभरात परिणाम पाहायला मिळत आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर सुरू असलेला संघर्ष हा काही आठवडे चालू शकते असे सूचित केले आहे. यावरून अमेरिकेला हा संघर्ष लगेच निकाली निघण्याऐवजी तो दीर्घकाळ चालणार असे अपेक्षित होते असे दिसून येते.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी इराणविरोधातील संभाव्य संघर्ष हा एका मोठ्या आणि चिवट शत्रूविरोधीतल कालबद्ध, मात्र एक गुंतागुंतीची मोहिम असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणबरोबरच्या चर्चेचे राजनैतिक मार्ग नावापुरते खुले असल्याचे संकेत देखील दिले आहेत.

“ही नेहमीच चार आठवड्यांची प्रक्रिया राहिली आहे. आम्हाला अंदाज होता की हे चार आठवडे किंवा जास्त काळ चालेल. हे नेहमीच चार आठवड्यांची प्रक्रिया राहिली आहे, त्यामुळे ती कितीही मजबूत राहिली तरी, हा एक मोठा देश आहे, त्यामुळे याला चार आठवडे किंवा त्याहून कमी कालावधी लागेल,” असे ट्रम्प म्हणाल्याचे वृत्त एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिले आहे.

इराणी लोकांशी आणखी चर्चेसाठी आपण तयार असल्याचेही ट्रम्प यांनी या वृत्तपत्राला सांगितले, पण ही चर्चा लवकरच होणार का याबद्दल मात्र ट्रम्प यांनी स्पष्टता दिलेली नाही. या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी “मला माहिती नाही” अशी प्रतिक्रिया दिली. “त्यांना चर्चा करायची आहे, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही गेल्या आठवड्यात चर्चा करायला हवी होती, या आठवड्यात नाही,” असे ट्रम्प पुढे म्हणाले.

अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण मध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे, त्यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर अनेक इराणी सैन्य अधिकारी आणि राजकीय नेते हे अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. यानंतर इराणणने देखील मध्य पूर्वेतील अनेक ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत.

ट्रम्प यांनी या संघर्षात अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूलाही दुजोरा दिला आहे. तीन अमेरिकन सैनिक या संघर्षात ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र या मृतांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नंतर ट्रूथ सोशलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी इराणमधील मोहीम ही, जगाने आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि प्रचंड अशा लष्करी कारवायांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

सध्या लष्करी कारवाया या पूर्ण ताकदीनिशी सुरू आहेत आणि जोपर्यंत आमची सर्व उद्दीष्टे साध्य होत नाहीत, तोपर्यंत त्या सुरूच राहतील. आमची उद्दिष्टे अत्यंत मजबूत आहेत,” असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पुढे सांगितले की, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांनी सज्ज असलेले इराणची राजवट ही प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी मोठा धोका असेल आणि इराणी नेत्यांनी स्वतः सभ्यतेच्या (civilization) विरोधात युद्ध पुकारले आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी बहरीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि जॉर्डन या देशांच्या नेत्यांशी संवाद साधला आहे आणि लष्करी कमांडरशी चर्चा केल्यानंतर, ते पुन्हा एकदा अमेरिकन जनतेला संबोधित करण्याच्या तयारीत आहेत.

इराणबरोबरच्या संघर्षाची व्याप्ती वाढलेली असताना ट्रम्प यांनी केलेल्या या विधानामुळे अमेरिका अनेक आठवड्यांच्या लष्करी संघर्षासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होण्याची चिन्हे देखील कमी दिसत आहेत.