अमेरिका-इस्रायल या देशांनी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर मध्य पूर्वेत संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. यादम्यान अमेरिकेने इस्रायलबरोबर मिळून इराणविरोधात राबवलेल्या या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ मोहिमेचे पहिल्या १०० तासांचे फुटेज जारी केले आहे.
युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रचंड वेगाने उडणारी लढाऊ विमाने, समुद्रातील युद्धनौकांमधून क्षेपणास्त्रे डागली जात असताना आणि जमिनीवरील वाहने व तळांवर होणारे हल्ले पाहायला मिळत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या हवाई आणि नौदल हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणमधील ७०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर ऑपरेशन एपिक फ्युरी लाँच करण्यात आले होते. अमेरिकन सैन्याने इस्रायलबरोबर मिळून सुनियोजितपणे इराणची सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी ही मोहिम हाती घेतली आहे.
या व्हिडीओबरोबर अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही मोहिम तात्काळ धोका असलेल्या लक्ष्यांवर केंद्रीत होती, ज्यामध्ये क्षेपणास्त्र प्रणाली, कमांड सेंटर्स आणि नेव्हल असेट्स यांचा समावेश होता.
या मोहिमेत अनेक अत्याधुनिक विमाने आणि शस्त्र प्रणाली वापरण्यात आली. तसेच युएस बॉम्बर्स आणि फायटर्स देखील वापरण्यात आले, ज्यामध्ये बी-२ स्पिरीट, एफ-३५ लाइटनिंग II, एफ-२२ रॅप्टर आणि बी-५२ स्ट्रॅटोफोर्ट्रेस यांचा समावेश होता. ज्यांनी जीपीएस-गायडेड म्युनिशन जसे की जीबीयू-३१ जेडीएएमचा वापर केला. तसेच विमानांनी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी, अमेरिकन युद्धनौका आणि पाणबुड्यांवरून डागलेल्या लांब पल्ल्याच्या टोमॅहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी रडार इंस्टॉलेशन्स आणि कमांड सेंटर्सना लक्ष्य केले.
व्हिडीओमध्ये काय म्हटलं आहे?
“युनायटेड स्टेट्स आणि त्यांच्या भागीदारांनी इतिहासातील सर्वात घातक, सर्वात गुंतगुंतीचे आणि सर्वात अचूक हवाई मोहिम ऑपरेशन एपिक फ्युरी लाँच केले आहे,” असे या व्हिडिओत सांगण्यात आले. त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकन सैन्य इराणची अमेरिकन नागरिकांना धमकावण्याची क्षमता नष्ट करण्यासाठी एक अभूतपूर्व मोहीम राबवत आहे. याव्यतिरिक्त, हा हल्ला इराणच्या नौदलाला लक्ष्य करत असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच यामध्ये इराणच्या नौदलाला देखील लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिडिओच्या शेवटी ट्रम्प यांच्या आवाजातील व्हाईसओव्हरमध्ये म्हटले आहे की, “या क्षणी कॉम्बॅट ऑपरेशन्स पूर्ण ताकदीने सुरू आहेत आणि आमची सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत ते सुरूच राहतील.”
दरम्यान अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि इतर महत्त्वाचे लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये जवळपास नऊ जण तर युएईमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
