इस्रायलने अमेरिकेसह संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. इराण देखील थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आयातुल्ला अली खामेनी यांच्यावर लक्ष ठेऊन होती. आयातुल्ला अली खामेनी यांचे लाईव्ह लोकेशन अमेरिकेकडे होते आणि त्यांच्या प्रत्येक बारीक हालचालीवर अमेरिका लक्ष ठेवत होती. युद्धाला सुरूवात झाली आणि सर्वात अगोदर अमेरिकेने आयातुल्ला अली खामेनी यांना ठार केले. त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर इराणकडून सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराणने प्रत्युत्तर देत रियाध येथील अमेरिकन दुतावासावर हल्ला केला. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
काय म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी?
न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले की गरज पडल्यास ते इराणमध्ये लष्कर पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांनी सांगितले की ऑपरेशन एपिक फ्युरी वेळेच्या खूप आधी प्रगती करत आहे, ज्यामध्ये तेहरानचे डझनभर उच्च अधिकारी मारले गेले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात असेही म्हटले आहे की प्रत्येक अध्यक्ष म्हणतो की आम्ही लष्कर पाठवू पण ते तसं करतातच असं नाही. पण इराणने जर आमच्यावर ती वेळ आणली तर आम्ही इराणमध्ये लष्कर उतरवण्यास मागेपुढे पाहणार नाही.
तर तुम्ही खुशाल ओबामांना दोष देऊ शकता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर लिहिलं आहे की, “जर मी ओबामांनी केलेला इराण अण्वस्त्र करार (JCPOA) रद्द केला नसता, तर तीन वर्षांपूर्वी इराणकडे अण्वस्त्रे असती. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक करार होता आणि जर तो तसाच राहिला असता, तर आज जग पूर्णपणे वेगळे असते. यासाठी तुम्ही बराक हुसेन ओबामा आणि जो बायडेन यांना खुशाल दोष देऊ शकता.”
इराणला लवकरच प्रत्युत्तर दिलं जाईल-ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर इराणचे नाव न घेता लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे. “प्रत्युत्तर काय असेल हे तुम्हाला लवकरच कळेल,” असे ट्रम्प न्यूजनेशनशी बोलताना एका मुलाखतीत म्हणाल्याचे एका रिपोर्टरने एक्सवर पोस्ट केले आहे. दरम्यान ट्रम्प यांचे हे विधान अमेरिकेच्या दूतावासावरील हल्ला आणि इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकन लष्करी जवानांचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनांच्या संदर्भात केले आहे.
